राज ठाकरेंना परळी कोर्टाचा झटका! बीडमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबई : सांगली, शिराळा नंतर आता बीड जिल्ह्यातही मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी झाला आहे. मराठी पाट्यांसंदर्भात झालेल्या आंदोलनाप्रकरणी हे वॉरंट जारी झालं. त्यामुळं आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे. परळी कोर्टाचं अजामीनपात्र वॉरंट या प्रकरणात आता गृहखातं अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणात गृहखातं कारवाई करेल अशी माहिती मिळत आहे. यामुळं राज ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे.
२००८ साली मराठी पाट्या आणि मराठी भाषेवरून मनसेच्या वतीनं परळी ईथं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी जबरदस्तीनं परळीत दुकानं बंद करण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला होता. याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसांपूर्वी नुकताचं सांगलीतील शिराळा येथे राज ठाकरेंविरोधात एक आजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. त्यानंतर आता पाठोपाठ परळी येथेही असं वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
याविषयी एक पत्र मुबंई पोलिसांना प्राप्त झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता मुंबई पोलिसही अॅक्शन मोडमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता यासंदर्भात कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.