माऊलींच्या मंदिरात घडला पसायदानाचा साक्षात्कार

प्रा. डॉ. एस. एन. पठाण, माजी कुलगुरू
शांतीच्या मार्गावर वाटचाल करताना
साक्षात्कारानंतर गुरुवर्य श्री महेश्वरनाथ बाबाजी यांनी श्री. मुमताज अली खान यांना हिमालयात साधना करण्यासाठी पाठविले आणि त्यांना नाथ पंथाची दीक्षा दिली व ते ‘श्री. एम’ अर्थात ‘मधुकरनाथ’ झाले. साक्षात्काराची ही चित्तथरारक कहाणी स्वतः ‘श्री. एम’ यांनीच आळंदी येथे विश्वरूप दर्शन मंचावर आषाढी वारीच्या निमित्ताने हजारो वारकर्यांसमोर सांगितली आणि लोक सद्गदित झाले.
ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे स्वप्न पाहिले. अद्वैत सिद्धांतांची मांडणी करून सर्वत्र एकच असे ‘आत्मतत्त्व’ संचार करते असे मांडले. हिंदू असो अथवा इस्लाम, दोन्ही धर्मात परमात्म्याचे अस्तित्व मान्य केले आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे व तो निर्गुण, निराकार आहे हेही मान्य केलेले आहे. म्हणजे सगुण उपासना असली तरी तिचे अंतिम उद्दिष्ट निर्गुणोपासनाच आहे. वारकरी संतांनी तर ईश्वराला ‘तुज सगुण म्हणू की निर्गुण ? असे विचारले आहे. अर्थात प्रत्येक धर्मात थोडे वेगळेपण असणे हे स्वाभाविक आहे. अशी सामंजस्याची व परमसहिष्णुतेची भूमिका घेतल्यामुळे हिंदू आणि मुसलमान आपण दोघे भाऊ-भाऊच आहोत असे संतांना वाटते.
याच पार्श्वभूमीवर ‘श्री. एम’ म्हणजे श्री. मुमताज अली खान यांची कहाणी अत्यंत अद्भुत वाटते. मुमताज अली खान यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९४९ रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे एका कर्मठ मुस्लिम कुटुंबात झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना महेश्वरनाथ बाबाजी यांनी दर्शन दिले व म्हणाले, ‘सर्व काही तुझ्या संचिताप्रमाणे पुढे घडेल’ आणि ते अदृश्य झाले. बाबांच्या अदृश्य होण्याचा परिणाम श्री. मुमताज अली खान यांच्या मनावर झाला व मग त्यांनी पुढे सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली.
एकदा भर उन्हाळ्यात ‘श्री. एम’ समुद्रकिनारी बसले असताना ते ग्लानीर अवस्थेत गेले व तेथे त्यांना त्यांचे गुरू महेश्वरनाथ बाबाजी यांचेकडून आदेश प्राप्त झाला की, ‘तू तीन दिवसांत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आळंदी क्षेत्री श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला जा!’
गुरूंच्या आज्ञेवरून ते आळंदीला आले व इंद्रायणीकाठी राहू लागले. ते भिक्षा मागून खात असत. एके दिवशी सकाळी त्यांना एक तेजस्वी युवक संत ज्ञानेश्वरांच्या समाधीकडून येताना दिसतो. श्री. मुमताज अली खान, वय वर्षे २४, हे आपले हात पुढे करून त्या तेजस्वी युवकाकडे कटाक्ष टाकतात आणि तेवढ्यात एक तेजस्वी ज्योती त्या युवकाच्या हातातून निघून श्री. मुमताज अली खान यांच्या हृदयात सामावून जाते. या साक्षात्कारानंतर गुरुवर्य श्री. महेश्वरनाथ बाबाजी यांनी श्री. मुमताज अली खान यांना हिमालयात साधना करण्यासाठी पाठविले आणि त्यांना नाथ पंथाची दीक्षा दिली व ते ‘श्री. एम’ अर्थात ‘मधुकरनाथ’ झाले. साक्षात्काराची ही चित्तथरारक कहाणी स्वतः ‘श्री. एम’ यांनीच आळंदी येथे विश्वरूप दर्शन मंचावर आषाढी वारीच्या निमित्ताने हजारो वारकर्यांसमोर सांगितली आणि लोक सद्गदित झाले. लोकांनी ज्ञानेश्वर माऊली आणि ‘श्री. एम’ यांचा जयजयकार केला.
‘श्री. एम’ यांनी पुढे वेद आणि उपनिषदे यांचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला. ‘श्री. एम’ यांचे वेदावरचे प्रवचन ऐकून डॉ. करणसिंग सारखे विद्वानही आश्चर्यचकित झाले. अशा या महान योग्यास, ‘श्री. एम’ यांना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी १ मे २०१६ रोजी “तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार’’ (५ लाख रुपये रोख व माऊलींची सुवर्णजडित प्रतिमा) देऊन त्यांचा पुणे येथे भव्य सत्कार केला व हिंदू-मुस्लिम बांधवांना संदेश दिला, ‘‘संघर्ष नको. परस्परांना साहाय्य करा.’’ ‘‘विनाश करू नका.’’ ‘‘कलह नको – मैत्री हवी… विश्वशांती हवी.’’