पवना नदीला प्रदुषणाचा विळखा; अतिक्रमण आणि सांडपाण्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी एकेकाळी स्वच्छ, निर्मळ वाहणारी पवना नदी आज धोक्यात आहे. बांधकामांसाठी नदीपात्रात केलेल्या अतिक्रमणामुळे आणि प्रक्रिया न करता थेट नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे या नदीचे पाणी दूषित झाले आहे. सद्यःस्थितीत पवना नदीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. बांधकामांमुळे निर्माण होणारा राडारोडा नदीपात्रात टाकल्यामुळे पवना नदीचे पात्र आकुंचित झाले आहे. ज्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रवाह अडला जातो. पावसाळ्यात पश्चिमेकडून येणारे पुराचे पाणी जेव्हा या आकुंचित पात्रातून पुढे जातो. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित होते आणि पुराच्या पाण्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.
नदीपात्रालागत दुतर्फा बाजूस मोठ्या प्रमाणात गवत, झाडे, झुडपे, वाढलेली आहेत. ज्यामुळे नदीत परिसरात अक्षरशः जंगलासारखी स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या अडथळ्यांमुळे पाण्याचा प्रवाह बदलतो. पाण्याचा मार्गही बाधित होतो. यामुळे पवना नदीच्या पात्राची नैसर्गिक प्रवाही क्षमता कमी होत आहे. अशा परिस्थितीत महापालिका अथवा स्थानिक प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची तातडीची उपाययोजना केली जात नाही. दिवसेंदिवस वाढत्या शहरीकरणामुळे पवना नदीवर मोठा ताण आला आहे. विविध भागांमधून निघणारे सांडपाणी थेट नदीत पात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीत जैवविविधता कमी होत चालली आहे. स्थानिक रहिवाशांनी नदी वाचविण्यासाठी विविध स्वच्छता अभियान राबवले असले तरी ते पुरेसे ठरत नाहीत.
पवना नदी वाचविण्यासाठी अनेक स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था स्वच्छता अभियान राबवत आहेत. नदीतील कचरा आणि सांडपाणी कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत. परंतु या प्रयत्नांना अपेक्षित यश आजतागायत मिळालेले नाही. कारण, शहरातील वाढलेले सांडपाणी आणि नदीत होत असलेली नियमित प्रदूषणाची समस्या अजूनही ‘जैसे थे’ आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कठोर आणि परिणामकारक उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे.