‘चंद्रमुखी’मध्ये दाहक वास्तवाचे दर्शन; कादंबरीकार विश्वास पाटील

पुणे : दिग्दर्शक राम गबाले यांच्यासोबतीने अपघाताने चौफुला येथे गेलो असताना लोकसंस्कृती आणि तमाशाशी निगडित कलाकारांशी परिचय करून घेण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या रात्रीचा झगमगाट आणि दाहक वास्तव असा विरोधाभास असलेल्या जीवनाचे दर्शन मला आढळून आले आणि म्हणून त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख ‘चंद्रमुखी’ कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे ‘चंद्रमुखी’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील, तसेच ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक आणि नायिका अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन अक्षरधारा बुक गॅलरी येथे करण्यात आले होते, त्यावेळी विश्वास पाटील बोलत होते. यावेळी अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक, रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर उपस्थित होते. अक्षय वाटवे यांनी मान्यवरांशी संवाद साधला.
प्रसाद ओक म्हणाले, ‘चंद्रमुखी’ कादंबरीचा आवाका फार मोठा होता. जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर आधारित कच्चा लिंबू हा चित्रपट बनवला होता. त्यावेळी चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. ‘चंद्रमुखी’ याच्या पटकथेची जबाबदारी मी चिन्मय मांडलेकरवरच सोपवली होती. लावणी आणि तमाशामध्ये जसा शृंगार आहे, तसेच त्यात सौंदर्यदेखील आहे. मराठी चित्रपटसृष्टीत लावणी व तमाशाप्रधान चित्रपटांवर काही अंशी टीका झाली. परंतु, याहून सुंदर काही आहे, असे मला वाटत नाही.