ताज्या बातम्यापिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रसिटी अपडेट्स

पीएमआरडी : अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालणार

पुणे : गेल्या काही वर्षांत पीएमआरडीच्या हद्दीत, तसेच शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यामध्ये मोठ्या बांधकामांसह लहान बांधकामांचासुद्धा समावेश आहे. वारंवार नोटिसा देऊनही बांधकामे चालू असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवितास धोका, वाहतुकीस अडथळा, नियमांची पायमल्ली अशा निकषांवर पालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा हातोडा उगारण्यात आला आहे. येत्या काळात अशा अनधिकृत बांधकामांवर तीव्र अधिक क्षमतेचा हातोडा चालणार असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रीतसर परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेने महंमदवाडीतील स.नं.३७-३८ (पै) आणि सहा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये ९ हजार २०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. पालिकेच्या वतीने रुफ टॉप, तीन अनधिकृत इमारती, वाढीव पार्किंग यांना दोन महिन्यांपूर्वी नोटीस दिली होती.

बिल्डरांच्या सेटलमेंटला खो देणे गरजेचे…

जिल्ह्यात पीएमआरडीएच्या हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली. दोन-तीन गुंठ्यांत पाच-सहा मजली इमारती उभ्या करून सर्वसामान्य लोकांना फ्लॅट विकले जातात. पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नाही, केवळ नोटिसा देऊन बिल्डरांबरोबर सेटलमेंट केली जाते.

गेल्या वर्षी मांजरीमधील गट क्रमांक १३० या ठिकाणच्या आणखी एका अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. तळमजला आणि वरील एक मजला असे एकूण ७८५० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.

नोटिसा देऊनही वेळेवर उत्तर दिले जात नाही. अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र परवानगी न घेता बांधकाम केले असता अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत कारवाई करण्यात येते.

_युवराज देशमुख, अधीक्षक अभियंता

पालिकेचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता हनुमंत खलाटे, शाखा अभियंता संदीप धोत्रे, कनिष्ठ अभियंता अनुप गाजलवर, भूषण सोनवणे, उमेश गोडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये