मेट्रोची कामे तीन महिन्यात पूर्ण करा; पोलीस आयुक्तांच्या मेट्रो प्रशासनाला सूचना

पुणे पोलिस प्रशासन आणि मेट्रो प्रशासनाची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. येत्या तीन महिन्यांत मेट्रोची कामे पूर्ण करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेट्रो प्रशासनाला बैठकीतून दिल्या.मेट्रोकडून सुरू असलेल्या कामांची पूर्तता वेगाने करण्याची आवश्यकता असून त्यामुळे परिसरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. पोलीस तसेच मेट्रोतील अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.
पुणे शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पुणेकरांना तासन्तास रस्त्यावर घालवावे लागत आहेत. त्यामुळे पोलिसांवरही ताण येत आहे. गणेशखिंड रस्त्यावर रेंजहिल्स कोपरा परिसरात शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका खांबाच्या उभारणीसाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होत असून वाहनचालकांसह रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मेट्रो अधिकाऱ्यांसह, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह विविध अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीनंतर तरी मेट्रोच्या कामाला गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.