“संजय राठोड यांची आरती करावी म्हणजे…”, मंत्रीपदावरून पूजा चव्हाणच्या आजीचा संताप

मुंबई | Pooja Chavan’s Grandmother On Sanjay Rathod – राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट या दिवशी पार पडला. यावेळी शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये शिंदे गटाचे संजय राठोड यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीनंतर विरोधकांसह भाजपच्या चित्रा वाघ यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता पूजा चव्हाणच्या आजीनेदेखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
पूजा चव्हाण या तरुणीची आजी शांताबाई राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यानं संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला अशी अपेक्षा होती की या पक्षाकडून खरोखरच पूजा चव्हाणला न्याय मिळेल. मात्र जो मंत्रिमंडळाचा काल शपथविधी झाला तो पाहून असं वाटत नाही. ज्या पक्षाने त्याला वाचवलं आणि (मंत्री म्हणून) स्थान दिलं आहे हे दुर्दैवी बाब आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा निर्णय अपमानास्पद आहे,” असं शांताबाई म्हणाल्या.
“खरं तर एका मुलीची अब्रू काढून तिचा गर्भपात करून तिचा खून केला जातो. स्पष्टपणे संजय राठोड म्हणतात की हे कर ते कर. एवढं ऐकूनसुद्धा संजय राठोड पहिल्या रांगेमध्ये बसतो. आरती करावी त्याची या (शिंदे-फडणवीस) सरकारने. त्याची पूजा करा म्हणजे तुम्हाला चांगलं वाटेल,” असा टोला देखील शांताबाई यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
“हा राठोड यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय म्हणजे महिलांचा अपमानच आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण असून पूजा चव्हाणला न्याय मिळत नाही. पोलीस तुमचे आहेत. ते क्लीन चीट देऊ शकतात पण जनता देणार नाही. तो गुन्हेगार आहे आणि शेवटपर्यंत गुन्हेगार राहणार. तो खुनी आहे खुनीच राहणार,” अशी टीकाही शांताबाई यांनी केली.
तुमची मागणी काय आहे? तुम्ही काय करणार आहात? असे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता शांताबाई म्हणाल्या, “पूजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. शेवटपर्यंत पूजासाठी आमचा लढा असाच सुरु राहील.”