पुण्यात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यता

प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने पाऊस सुरू असून, या पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये देखील मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी झाला नसून दररोज पुणे शहरात ५५० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच पावसाळ्यात टेरेस, कुंडी आदी ठिकाणी पाणी साठलेले असते.
त्यामुळे येणार्या काळात डेंग्यूचे रुग्ण वाढण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. मात्र या सर्वांसाठी महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजीव वावरे यांनी दिली आहे. महापालिकेमार्फत दोन ठिकाणी सेंटीलायझा मशीन बसवण्यात आले आहे. या मार्फत पुण्यातील कमला नेहरू आणि नायडू हॉस्पिटलमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येते. जर एखादा रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाला तर त्याला कमला नेहरू अथवा नायडूमध्ये उपचारासाठी दाखल करता येते. या शिवाय कीटक प्रतिबंधक क्षेत्रामार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालायात कीटक सेवा पाठवून प्रत्येक भागात महापालिकेच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. याशिवाय महापालिकेकडून आपण जनजागृती करतो की, नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे पाणी साठवून देऊ नये. पाणी जर साठत असेल तर जवळच्या क्षेत्रीय कार्यालयाला कळवा, याशिवाय परिसरात जर एखादा डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर त्याला शोधून तो ब्रिडींग करून तो विषाणू नष्ट करतील, त्या भागात फवारणी, धूर फवारणी करून तो डेंग्यूचा विषाणू नष्ट केला जातो. अशा प्रकारची तयारी महापालिकेकडून करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी वावरे यांनी यावेळी दिली.
गेल्या काही दिवसांपासून बीए. ४ आणि बीए. ५ या ओमिक्रॉनच्या प्रकारांचे रुग्ण वाढत आहेत. १ ते ७ जुलै या आठवड्यात पुणे जिल्ह्यात तब्बल ६१९४ नवीन रुग्णांची भर पडली असून ही वाढ तब्बल १७ टक्के आहे.
गेल्या काही दिवसांत ओमिक्रॉनचे प्रकार बीए. ४ आणि बीए. ५ यांमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत काहीशी वाढ दिसण्यास सुरुवात झाली. ही वाढ सुरू झाल्यानंतर प्रथमच पुणे जिल्ह्यात या आठवड्यात ६१९४ एवढ्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यांपैकी ३,४०८ रुग्ण पुणे शहरात आहेत.