देश - विदेशलेखसंपादकीय

अमृतमहोत्सवी… आन, बान आणि शान ‘तिरंगा’..!

लक्षवेधी | युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याचबरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज तिरंगा झाला. भारतीयांच्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे, राष्ट्राभिमानाचे प्रतीक आपला तिरंगा आहे.

शेकडो भारतीयांनी “वंदे मातरम” म्हणून या देशासाठी बलिदान दिलं… हा देश एका मंत्रात गुंफला त्या “जय हिंद” चं प्रतिक म्हणजे भारतीय तिरंगा ध्वज आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीने या देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून तिरंगा ध्वज स्वीकारला. १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगावंदन केले जाणार आहे.त्यानिमित्त आपल्या राष्ट्रध्वजाची माहिती व्हावी, यासाठी हा लेखनप्रपंच…

ध्वजाचा प्राचीन इतिहास
ध्वज म्हणजे मानाचे, यशाचे, आदर्शाचे चिन्ह. अतिप्राचीन काळी संदेश वाहकाचे प्रतीक. प्राचीन मानवी समूहांनी किंवा टोळ्यांनी आपापल्या गटाची चिन्हे म्हणून पशु, पक्षी, तसेच काल्पनिक किंवा दैवी वस्तू, देवता यांच्या चित्रांचा उपयोग म्हणून केलेला दिसतो. शत्रू पक्षाला किंवा मित्रपक्षाला ओळखायला त्यापेक्षा अधिक उत्तम साधन त्याकाळी काही नव्हते. महाभारत, युक्तिकल्पतरू, अपराजितपृच्छा अशा प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथातील ध्वजवर्णनावरून ध्वजपताका हा कुलचिन्ह, आपल्या गौरवी परंपरेचे प्रतीक म्हणून प्राणांतिक मोल ध्वजाला दिल्याची उदाहरणे आहेत.

मराठ्यांचा अटकेपार झेंडा
प्राचीन काळात ध्वज हा गौरवाचा विषय होता. तसा मध्ययुगात आन, बान, शान म्हणून विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी प्रत्येकाच्या रक्तालाही उसळी येईल असे “हर हर महादेव” या मंत्राबरोबर स्वराज्य ध्वज उंचावून मृत्यूलाही जिंकणारे स्फुल्लिंंग निर्माण केले. तसेच या ध्वजाला स्वराज्यातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या रक्ताचं नातं वाटावं एवढं बळ निर्माण करून दिलं. छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज यांच्या पराक्रमाचा गौरवी इतिहासामधला काही काळ वगळता सुरूच राहिला; नव्हे मराठ्यांनी आपलं स्वराज्य प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलं. सर्वात मोठं यश मिळालं ते २८ एप्रिल १७५७ रोजी. हे मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत गौरवी सोनेरी पानच.रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्‍वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत खडतर प्रवास करून आताच्‍या पाकिस्‍तानात असलेला सिंध खोऱ्यातील “अटक” किल्‍ला जिंकला. त्‍यातून ‘अटकेपार झेंडे’ ही म्हण प्रचलित झाली.

तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला
स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा, हे ठरविण्यासाठी एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले, की काँग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिन्ह ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलै १९४७ या दिवशी ठरावाला मंंजुरी दिली.
भारताचा राष्ट्रीय ध्वज हा भगवा (केशरी), पांढरा आणि हिरवा असा क्षैतिज आयताकृती तिरंगा आहे. त्याचबरोबर अशोकचक्र, त्याच्या मध्यभागी आहे. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज तिरंगा झाला. हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या त्यागाचे, राष्ट्राभिमानाचे प्रतीक आपला तिरंगा आहे.
हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून आपल्या देशाने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय ध्वज तिरंगा प्रत्येकाच्या घरावर फडकावा, म्हणून “हर घर तिरंगा” ही मोहीम राबविली आहे. प्रत्येक भारतीयांनी या मोहिमेत मोठ्या अभिमानाने, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन आपापल्या घरावर आपल्या देशाची आन, बान आणि शान तिरंगा हा राष्ट्रध्वज ध्वजसंहितेचे पूर्ण पालन करून फडकवावा.

झण्डा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा
झण्डा ऊँचा रहे हमारा
विजयी विश्व तिरंगा प्यारा

हे देशभक्तिपर गीत म्हणजे प्रत्येक भारतीय माणसाच्या मनातली भावना आहे. आपण भारतीय म्हणून आपल्या प्रतीकाचे जतन तर करूच, पण हा देश सुजलाम, सुफलाम होण्यासाठी अजून मोठे प्रयत्न करू… जगात आपला देश, आपला तिरंगा सदैव अभिमानाने फडकत राहावा, ही भावना अंतःकरणात ठेवू या… जय हिंद..!!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये