“…त्यासाठी आत्तापासूनच तयार राहा”, संरक्षणमंत्र्यांचा सूचक इशारा
नवी दिल्ली | Rajnath Singh – नौदल कमांडर्स यांच्यासाठी लष्करी सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नौदल कमांडर्स परिषद 2023 चं आयोजन करण्यात आलं आहे. ही परिषद भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांत जहाजावर आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सूचक इशारा दिला आहे. भविष्यातील संघर्षासाठी आत्तापासूनच तयार राहा, असं ते म्हणाले.
भविष्यातील संघर्षांसाठी आत्तापासूनच तयारा राहा, असा सूचक इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे. तसंच प्रत्येकाला सतत विकसित होत असलेल्या जागतिक व्यवस्थेनं पुन्हा नवे धोरण आखण्यास भाग पाडलं आहे. उत्तर आणि पश्चिम सीमा तसंच संपूर्ण किनारपट्टीवर सतत लक्ष ठेवावं लागणार असल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून पुढील 5-10 वर्षांमध्ये 100 अब्जांपेक्षा जास्त किंमतीच्या ऑर्डर्स मिळण्याची अपेक्षा आहे. संरक्षण क्षेत्र येत्या काळात देशाच्या आर्थिक विकासात एक प्रमुख भागीदार असणार आहे. आज आपलं संरक्षण क्षेत्र रन वे वर आहे त्यामुळे लवकरच ते मोठी भरारी घेईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देईल. अमृत महोत्सवात जर भारताला जगातील अव्वल स्थानी पाहायचं असेल, तर आपण संरक्षण महासत्ता बनण्याच्या दिशेनं धाडसी पावलं उचलली पाहिजेत, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.