देश - विदेश

शिवसैनिक मेळवावा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेप्रणीत शिवसेनेचे सर्वेसर्वा स्वतः उद्धव ठाकरे यांच्यामध्ये स्वबळाची लढाई सुरू झाली आहे. नक्की शिवसेना कोणाची, हा न्यायालयात गेलेला वाद असला, तरी याशिवाय कार्यकर्त्यांना गटांमध्ये सहभागी करून घेणे, आजी-माजी आमदार-खासदारांना आपल्या पक्षात सामील करून घेणे, त्याचबरोबर शिवसेनेची मानके आणि प्रतीके असणाऱ्या बाबींवर हक्क प्रस्थापित करणे हा सगळा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे.

त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे दर वर्षी दसऱ्यानिमित्त होणारा शिवाजी पार्क मैदानावरील मेळावा दसरा मेळावा. हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला शिवसैनिकांसाठीचा उत्सव होता. यामध्ये विचारांचे सोने लुटले जायचे आणि या लुटीतून शिवसैनिकांना वर्षभर बळ मिळायचे असा समज शिवसैनिकांमध्ये रुजलेला होता. साहजिकच शिंदे गटाने आपण स्वतःच शिवसेना आहोत असे जाहीर केल्याने शिवाजी पार्क येथील मैदानावर आपण मेळावा घेणार असे जाहीर केले. तोच प्रकार उद्धव ठाकरे यांनीही केला आणि न्यायालयात उद्धव ठाकरे यांना दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे घेण्याची परवानगी मिळाली.

आता या दोन्ही मेळाव्यांमध्ये शिवसैनिक सर्वाधिक कोठे उपस्थित असतील यावरून महाचर्चा सुरू झाल्या आहेत. सत्ता, यंत्रणा, पैसा या सगळ्याचा उपयोग मनुष्यबळ वाढवण्यासाठी केला जाणार आहे. हे केवळ एकाच बाजूने होईल असे नाही, तर दोन्ही गट यासाठी सक्रिय आहेत आणि ज्या गटाला आपण तुलनेने कमी पडतो असे वाटते तो नैतिकतेच्या गप्पा मारत आमचे शिवसैनिक हे कट्टर शिवसैनिक आहेत, गर्दीपेक्षा दर्दी मंडळींनाच विचारांचे महत्त्व असेल असा प्रचारही सुरू करण्याच्या मन:स्थितीत आहेत. हा सगळा प्रकार पाहता दसऱ्याचा शिवसेनेचा मेळावा हा सर्वसामान्यांसाठी दोन्ही मेळावे मिळून एक मेळावा असा असेल.

एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप त्यांना दिलेली उत्तरे किंवा काढलेली उणीदुणी यापलीकडे खरे तर या मेळाव्यांमधून फार काही हाताशी लागेल असे वाटत नाही. तसेही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारांचे सोने लुटायचे होते किंवा असते ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचारांचे. ते विचार सध्या शिंदे गट जाहिरातीच्या माध्यमातून जनमानसात लुटत आहे.

वाहिन्यांमधील जाहिरातींमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि युतीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेले विचार सध्या शिंदे गट मोठ्या प्रमाणात दाखवत व ऐकवत आहे. यातून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव ठाकरे हेच फारकत घेत असल्याचे शिंदे गटाला दाखवून द्यायचे आहे. आणि उद्धव ठाकरे यांना आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि बाळासाहेबांचे विचार आपणच पुढे नेणार आहोत असे सांगायचे आहे. नक्की कोण कोणाचे विचार पुढे नेते याचा निकाल सर्वसामान्य जनता मतपेटीतून नक्कीच देईल. परंतु त्यापूर्वी दावा करणाऱ्या दोन्ही गटांना शिवसेना आपलीच आहे हे सांगणे गरजेचे आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा आता कळीचा मुद्दा बनलेला आहे. उद्धव ठाकरे यांना या मेळाव्यातून शिवसैनिकांना प्रोत्साहन, उत्साह, ऊर्जा देणे गरजेचे आहे. तसे न केल्यास उरलेली मंडळीही शिवसेना सोडून जातील यात शंका नाही. एकीकडे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट पडत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना सोडून बरेचसे कार्यकर्ते सोडून जाताना दिसत आहेत. शिवसेनेचे वेगवेगळ्या भागांचे प्रमुख शिंदे गटांमध्ये सहभागी होत आहेत. अशा वेळी शिवसेनेला स्वतःचा काही कार्यक्रम देणे अत्यंत गरजेचे आहे. शिवसेना वाढवण्यासाठी स्वतःचा विचार मांडण्याचीही आवश्यकता आहे. कारण प्रतिक्रियेवर चालणारे राजकारण फार दिवस चालत नाही. मूळ क्रिया संपली, की प्रतिक्रिया निरुपयोगी ठरते आणि हा प्रकार शिवसेनेच्या सुरुवातीपासून पाहायला मिळतो. मराठी माणसाचे कारण काढून शिवसेना वाढवण्यात सुरुवात झाली. मात्र इतर प्रांतीय शिवसेनेत आल्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मराठी मुद्दा सोडून हिंदुत्व हा मुद्दा घ्यावा लागला. याचे कारणच प्रतिक्रियेवर फार काळ राजकारण चालवता येत नाही. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही मेळावे हे एकमेकांना दिलेल्या प्रतिक्रिया असतील. मात्र जनतेच्या दृष्टीने लोकशाही टिकवण्याचा आणि ती मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असेल. तेव्हा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांसाठी शुभेच्छा देताना शिवसेना कोणाचीही असो, किमान लोकशाही टिकवा, समस्त शिवसैनिक तितुका मेळवावा हे सांगणे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये