
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला सर्वांगीणतेचा स्पर्श होणे आवश्यक असतो. त्यातच त्याला लाभलेले शिक्षक जर बहुस्पर्शी असतील तर त्यांच्या प्रगतीची वाट सुलभ होते. आंबेगाव तालुक्यातील निरगुडेश्वर शिक्षण विकास मंडळाचे पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर येथे २००१ पासून कार्यरत असणारे संतोष वळसे हे उपक्रमशील शिक्षक. गणित या विषयाचे उत्कृष्ट व यशस्वी अध्यापन करत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम विद्यालयात राबविले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गणित विषयाचे आकलन व्हावे, मुलांत गणिती, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, खगोलशास्त्र, अवकाश निरीक्षण याविषयी माहिती मिळावी म्हणून विद्यालयात ते उपक्रम राबवत असतात.
त्यांनी बारावी शास्त्र शाखेनंतर बीएससीला प्रवेश घेतला, पण दुसर्या वर्षाला असताना डी.एडला प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यांनी निरगुड येथील शाळेत शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. पण मनातील शैक्षणिक जिद्द त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. नोकरीत असतानाच त्यांनी बी.एड पूर्ण केले. या काळात सुट्टीवर असतानासुद्धा त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली. त्यांचे गणित विषयावर प्रभुत्व असून, गेली २२ वर्षे १० वीचा गणित विषयाचा १०० टक्के निकाल आहे. ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, शैक्षणिक फी मिळवून देणे, संगणकाच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी संगणक, ई-लर्निंग प्रोजेक्टर, तसेच स्कॉलरशिप, झिरो तासिका यावर बारकाईने लक्ष ठेवत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असतात.
चालू वर्षी संस्थेने सुरू केलेल्या एनसीसीमध्येसुद्धा ते विशेष लक्ष देत आहेत. तसेच शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, विद्यार्थी, पालकाभिमुख म्हणून संतोष वळसे यांना ओळखलं जातं. त्यांच्या या कार्यामुळे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सध्या विद्यालयात पर्यवेक्षक पदावर काम करीत असताना आपल्या सर्वच सहकार्याना विश्वास घेऊन काम करीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असणारे असे उपक्रमशील शिक्षक असतील तर नक्कीच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतील व आपल्या विद्यालयाचे नाव मोठे करतील यात शंकाच नाही.