पुणेसिटी अपडेट्स

पुरंदर विमानतळबाधित सातही गावांचा विरोध

काळे झेंडे लावण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहिष्काराचा ठराव

सासवड : पुरंदर तालुक्यातील संभाव्य छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन, पुरंदर तालुक्यातील बाधित सातही गावांचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी विमानतळ विरोधात बाधित गावातील शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळली अाहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. पुरंदर तालुक्यातील संभाव्य विमानतळासाठी तीन हजार हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी, या सात गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बाधित सातही गावच्या शेतकऱ्यांनी सोमवारी एकत्रित येत, विमानतळ विरोधात आक्रमक पवित्रा घेत बैठक घेऊन काहीही झाले तरी संभाव्य विमानतळ होऊ देणार नाही, वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली सहा, सात वर्षे विमानतळ प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ व आपण सगळे मिळून झगडत आहोत. यात आपल्याला यश येणार आहे. शेतकरी वर्गाला वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. शेतकरी वर्गाचे धन म्हणजे त्याची शेती. त्या शेतीच्या जिवावर तो आपल्या संसाराचा गाडा चालवत आहे आणि आमची शेती विकून आम्ही काय करायचं, आमची मुल बाळ बायका वाऱ्यावर सोडून द्यायच्या का? आज कोट्यवधी रुपये देऊन तुम्ही जर आमची काळी आई खरेदी करताल तर भविष्यात पुरंदर तालुक्यातील अनेक बागायती शेती नामशेष झाल्याशिवाय रहाणार नाही. कारण या ठिकाणी सगळी सिमेंटची जंगले ऊभी होऊन शेती नामशेष होणार आहे. याचसाठी सुरवातीपासून या विमानतळाला विरोध आहे.
— दत्तात्रय झुरंगे
विमानतळ प्रकल्पविरोधी अध्यक्ष

त्याचबरोबर दिवाळीच्या काळात बाधित गावातील घरावर काळे झेंडे लावण्याचा व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. यावेळी पुरंदर – हवेलीचे लोकप्रतिनिधी आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद सदस्य, व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय जगताप यांनी विमानतळास विरोध असल्याचे जाहीर करीत, स्थानिकांची पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले. याबाबत बोलताना उदाचीवाडीचे सरपंच संतोष कुंभारकर म्हणाले, प्रस्तावित विमानतळास आमच्या जमिनी देण्यास आमचा विरोध आहे, भविष्यात हा विरोध तीव्र करण्यासाठी, न्यायालयीन लढाई लढण्याची आमची तयारी आहे. काहीही झाले तरी विमानतळ होऊ देणार नाही, असा इशारा संतोष कुंभारकर यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये