डिस्प्ले व्हॅनद्वारे तालुकास्तरावर जनजागृती
महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रारंभ
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा प्रारंभ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. विधानभवन येथे दोन फिरत्या एलईडी डिस्प्ले व्हॅनला झेंडा दाखवून राव यांनी स्टार्टअप यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण, यात्रेबाबतची संपूर्ण माहिती व उद्देश, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्यांचे पैलू तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती या एलईडी डिस्प्ले व्हॅनवरून प्रदर्शित केली जाणार आहे. स्टार्टअप यात्रा दि. १७ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात दाखल होत असून याअंतर्गत डिस्प्ले व्हॅनद्वारे दि. ३० ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रचार, प्रसिद्धी होणार आहे. तालुकास्तरीय प्रसिद्धीनंतर जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजिले जाणार आहे.