पुण्याला पावसानं झोडपलं, रस्त्यांना तलावाचे स्वरुप; अंबिल ओढा परिसरात पूर परिस्थिती!

पुणे : (Pune City Rain News) काल शहरात झालेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्याचे लोंढे आल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरुप निर्माण झाले होते. तर अंबिल ओढा परिसरात पुन्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. अनेक नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे मोठे नुकसान देखील पहायला मिळाले. याअगोदर देखील बरोबर तीन वर्षापुर्वी अशा प्रकारची महापूर पुरस्थिती निर्माण होऊन हाहाकार माजला होता. त्याचीच पुनरावृत्ती काल पुण्यात पहायला मिळाली.
दरम्यान, काल दुपारच्यानंतर तासभरातच झालेल्या मुसळधार पावसाला सर्व शहर न्हाऊन निघाले. त्यामुळे काही वेळातच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले. पावसामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. या पाण्यातून वाहने बाहेर काढणेही कठीण झाले होते. अंबिल ओढ्याच्या परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरण्याचे प्रकार घडले.
इंदिरानगर भागासह पर्वती, धनकवडी, के. के. मार्केट परिसर, इंदिरानगर, चंदननगर पोलीस स्थानक, कोथरूडमधील वेधभवन, वनाज, पाषाण, बी. टी. कवडे रस्ता, सोमेश्वरवाडी, वानवडी, कात्रज उद्यान आदी भागांत पाणी शिरण्याचे प्रकार घडले. अंबिल ओढा भागामध्ये २५ सप्टेंबर २०१९ मध्ये महापूर आला होता. त्यात शेकडो वाहने वाहून केली, तर काही लोकांचा बळीही गेला होता.