सिंहगडावर भरदिवसा युवक युवतीवर जीवघेणा हल्ला!

पुणे | सिंहगडावर अनेक घटना घडल्याच्या बातम्या सतत समोर येत असतात. अशातच सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याच्या मैत्रिणीची लूट करण्यात आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हवेली पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेककुमार बाबुलाल प्रसाद (वय 28) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
विवेककुमार व त्याची मैत्रीण किल्ल्याच्या आतकरवाडी पायी मार्गाने दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गडावरून खाली येत होते. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. त्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत असताना विवेककुमार याने प्रतिकार केला असता हल्लेखोराने त्याच्या हातावर कोयताने वार केले. आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
त्यानंतर दोघेही भयभीत होऊन धावत आतकरवाडी येथे आले. तेथे वनरक्षक संदीप कोळी यांनी विवेककुमारच्या हातावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन-तीन बोटे तुटून रक्तस्राव होत असल्याने प्राथमिक उपचार करता आले नाही. त्यानंतर कोळी यांनी हवेली पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिस ठाणे अंमलदार अजय पाटसकर म्हणाले की, प्रसाद याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.