पुणे फेस्टिव्हल : मराठी कार्यक्रमांची कलाकुसर

सांस्कृतिक महोत्सवांमध्ये अग्रेसर म्हणून ओळखल्या गेलेल्या पुणे फेस्टिव्हलचे यंदाचे ३४ वे वर्ष. गेली २ वर्षे कोरोनामुळे आणि सन २००९ मध्ये स्वाइन फ्लूमुळे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत. उर्वरित ३१ वर्षांमध्ये पुणे फेस्टिव्हलच्या सर्व कार्यक्रमांना रसिक पुणेकरांनी अलोट प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या या पुण्यभूमीत लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव काळात मोठा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून नवे परिमाण देण्याचा प्रयत्न पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी केला त्याची सुरुवात ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना १९८९ मध्ये त्यांनी केली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत पुण्यात आणावेत, देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करावे आणि स्थानिक कलावंताना हक्काचे व्यासपीठ मिळवून द्यावे हा हेतू याच्या आयोजनामागे होता. याच्या आयोजनात प्रथमपासून पुणे फेस्टिव्हल कमिटी पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांचा एकत्रित मोठा वाटा राहिला आहे.
पुणे फेस्टिव्हलमध्ये सातत्याने दर्जेदार कार्यक्रम सादर होत असताना, मराठी कार्यक्रमांवरही जाणतेपणाने भर देण्यात आला. मराठी चित्रपट महोत्सव व मराठी नाट्य महोत्सव ही तर पहिल्या वर्षीच्या महोत्सवाची खास आकर्षणे होती. तब्बल १५ मराठी चित्रपट आणि १८ मराठी नाटके पहिल्या वर्षी महोत्सवात सादर झाली. आर्य चाणक्य, आयुष्याच्या वाटेवर एक झुंज वाऱ्याशी, एकच प्याला, इथे ओशाळला मृत्यू, संगीत मानापमान, नातीगोती, रमले मी रिमझिम गाणी, संगीत स्वयंवर, संगीत सौभद्र, तसे आम्ही सज्जन, तू फक्त हो म्हण, वाहतो ही दुर्वांची जुडी, वाडा चिरेबंदी, कालचक्र अशा पुणे फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेल्या मराठी नाटकांना पुणेकरांनी तोबा गर्दी केली होती; तसेच छत्रपती शिवाजी, धाकटी जाऊ, एक गाव बारा भानगडी, हा माझा मार्ग एकला, कन्यादान, कुमकुम, लग्न पाहावे करून, माझे बाळ, मोहित्यांची मंजुळा, पाहू रे किती वाट, रामशास्त्री, रंगल्या रात्री अशा, साधी माणसं, सरकारी पाहुणे, शेजारी असे तब्बल १५ मराठी चित्रपट पुणे फेस्टिव्हलमध्ये पहिल्या वर्षी दाखवण्यात आले. पुणेकर रसिक प्रेक्षकांना ही जणू मेजवानीच होती. मराठीची ही परंपरा सलग ३४ वर्षे चालू आहे ही विशेष बाब मानावी लागेल.
पुणे फेस्टिव्हलमध्ये दर वर्षी अतिशय नियोजनबद्ध रीतीने मराठी कार्यक्रमांची आखणी केली जाते. आत्तापर्यंत सादर झालेल्या मराठी कार्यक्रमांची जंत्री पाहिली, की मन पक्क होते. स्व. पु. ल. देशपांडे आणि स्व. शांताबाई शेळके यांच्यावरील कार्यक्रम मराठी हास्य कविसंमेलन, मराठी नाटके, एकपात्री मराठी हास्योत्सव, मराठी हास्यभूषण स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विजेत्या तीन मराठी एकांकिकांचे प्रयोग, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेचा प्रयोग, लावणी महोत्सव, मराठी भावगीते व मराठी चित्रपट गीतांचे कार्यक्रम, नाट्यगीते, प्रभात चित्रपटाच्या ७५व्या वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त गीतरामायण अशा अनेक मराठी कार्यक्रमांची पुणे फेस्टिव्हलमध्ये रेलचेल असते. पुणे फेस्टिव्हलमध्ये घेतलेल्या ‘हास्यभूषण’ स्पर्धेतून अनेक एकपात्री कलाकार तयार झाले. तसेच महाराष्ट्राची थोर परंपरा असणाऱ्या कीर्तनाच्या विविध प्रकारांचे दर्शन घडवणारा कीर्तन महोत्सव पुणे फेस्टिव्हलमध्ये आवर्जून सादर केला जातो व आपल्या संस्कृतीशी असणारे नाते अधिक घट्ट केले जाते.
मराठमोळ्या लावणीला व्यासपीठ मिळवून देण्यातही पुणे फेस्टिव्हलचा पुढाकार राहिला. त्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत लावणी ग्रुप आवर्जून बोलवले जातात व त्यांना या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर आपली मराठमोळी कला सादर करण्याची संधी दिली जाते.
महाराष्ट्रातील मराठी कवींना आवर्जून बोलावून मराठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात पुणे फेस्टिव्हलने सदैव पुढाकार घेतला. ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे व फ. मुं. शिंदे यांचे सूत्रसंचालन, रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यामुळे ही मराठी कविसंमेलने अनेकदा पहाटेपर्यंत रंगली. यामध्ये दर वर्षी एका ज्येष्ठ मराठी कवीचा होणारा सत्कारदेखील मनाला हळवा करून जातो. यामध्ये शांता शेळके, नारायण सुर्वे, विं. दा. करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विठ्ठल वाघ, फ. मुं. शिंदे, ना. धों. महानोर, नारायण सुमंत, विष्णू सूर्या वाघ इत्यादींचे झालेले सत्कार आजही सर्वांच्या स्मरणात आहेत.
केवळ खासगी प्रायोजकत्वाद्वारे चालणारा आणि सर्व कार्यक्रम प्रेक्षकांसाठी मोफत असणारा पुणे फेस्टिव्हल यंदा ज्येष्ठ उद्योगपती व पुणे फेस्टिव्हलचे आधारस्तंभ पद्मभूषण राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे.
सन १९८९ मध्ये खासदार सुरेश कलमाडींनी बघितलेले भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे स्वप्न सलग ३४ वर्षे साकार होत राहिले. पहिल्यापासूनच पुणे फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बनला आहे. पुणेरीपण न सोडता मराठी कार्यक्रमांची रेलचेल करीत मराठी सारस्वताला सदैव मानाचा मुजरा करणाऱ्या पुणे फेस्टिव्हलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
— मोहन टिल्लू, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक, बालगंधर्व व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे फेस्टिव्हल