मानाच्या व प्रमुख मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी

पुणे | Ganesh Visarjan 2023 | दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती मंडळांनी बाप्पाच्या विसर्जनाची (Ganesh Visarjan) जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी ढोल-ताशा पथक, ध्वजपथक, विविध संस्था, संघटनांचा सहभाग असणार आहे. तर आता अनंत चतुर्दशीला काही तासच राहिले आहेत. त्यामुळे गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. उद्या (28 सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीची सुरुवात महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून होणार आहे.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती – ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सकाळी उत्सव मंडपातून लोकमान्यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ होणार आहे. मंडळाचे कार्यकर्ते खांद्यावरुन पालखी वाहणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून कसबा गणपतीची मिरवणूक मार्गस्थ होईल. यावेळी रुद्रगर्जना, कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद ऐकायला मिळणार आहे.
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी गणपती – ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची मिरवणुक ढोलताशांच्या गजरात सुरू होणार आहे. चांदीच्या पालखीपुढे ताल ढोल-ताशा पथकांचे वादन आणि विष्णूनाद पथकाचे शंखनाद असेल. तर शिवमुद्रा ढोल-ताशा पथकानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त खास शिवराज्याभिषेक रथ साकारला आहे.
मानाचा तिसरा : श्री गुरुजी तालीम गणपती – श्री गुरूजी तालीम गणपतीची मिरवणूक ही जय श्रीराम “रामराज्य’ या आकर्षक पुष्परथामध्ये असणार आहे. यावेळी फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके, जयंत नगरकर यांचे नगारावादन, ढोल- ताशा पथकांचे वादन ऐकायला मिळेल.
मानाचा चौथा : श्री तुळशीबाग मंडळ गणपती – श्री तुळशीबाग गणपतीची मिरवणूक ही “महाकाल’ रथातून निघणार आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या सवारीची आठवण या मिरवणुकीनमधून होणार आहे. तर यामध्ये उज्जैनचे अघोरी महाराज यांचा सहभाग असणार आहे. यावेळी शिवप्रताप ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.
मानाचा पाचवा : श्री केसरीवाडा गणपती – श्री केसरीवाडा गणेशाची मूर्ती फुलांनी सजवलेल्या पारंपरिक पालखीतून विराजमान होणार आहे. यावेळीशिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहेत. तर इतिहास प्रेमी मंडळाकडून “चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा देखावा आकर्षणाचे केंद्र असणार आहे.