तिच्यावर अत्याचार होत होते आणि पुणेकर केवळ पाहात होते; हडपसर मधील धक्कादायक घटना
पुणे | महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. या प्रकरणी तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्या पाटील (वय 22) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भेकराईनगर चौकात महिलेचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. महिलेची मुलगी शाळा सुटल्यानंतर आईच्या मदतीसाठी आली होती. ‘भाजी कशी दिली,’ असे विचारून लक्या पाटील मुलीजवळ गेला. त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले.
मुलीच्या आईने हा प्रकार पाहून त्याला जाब विचारला असता आरोपीने मुलीच्या आईला शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. या प्रकारानंतर आरोपीने पळ काढला. अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून आरोपी फरारी झाला आहे. हडपसर पोलीस (Pune Police) आरोपीचा शोध घेत आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.