Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

पुण्यातल्या ‘या’ नऊ गावांचं नशिब उघडणार! सांडपाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार

पुणे : नव्याने समाविष्ट गावांच्या सांडपाण्यावर (Sewage Waste Water) प्रक्रियेसाठी पुणे महापालिका (Pune Municipal Corporation, PMC) दोन टप्प्यात काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात ३५२ कोटींच्या कामास मान्यता देण्यात आली होती. यानुसार केशवनगर (Keshavnagar) येथे १२ एमएलडी क्षमतेचे तर मांजरी येथे उरुळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) या दोन गावांसाठी ९३ एमएलडी क्षमतेचे शुद्धीकरण (Sewage Water Purifier) केंद्र उभारले जाणार होते.

सुमारे १५० कोटींची ही कामे आहेत तर उर्वरित निधीतून या दोन गावांसह उर्वरित गावांमध्ये ट्रंकलाइन टाकण्यात येणार होत्या. दुसऱ्या टप्प्यात ९ गावांमध्ये त्यांच्या जोड लाइट टाकण्यात येणार होत्या. यासाठी सुमारे १५० कोटींचे काम होते. मात्र, ही दोन गावे वगळल्याने पालिकेने या दोन गावांतील सदर कामे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यासाठीचा निधी प्रशासन इतर ९ गावांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामासाठी देणार आहे.

पालिकेत समाविष्ट ९ गावांना तब्बल १२० कोटींचा निधी उपलब्ध होणार असल्याने या गावांमधील सांडपाणी १०० टक्‍के संकलन होणार आहे. तसेच या गावांचे सांडपाणी महापालिकेकडून जायका योजनेत उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी केंद्रात प्रक्रिया करून नदीत सोडले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे काम होणार होते, यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी गेला असता आता, ही दोन गावे वगळल्याने लगेच निधी उपलब्ध झाल्याने पुढील एक ते दोन वर्षातच हे काम होणार असल्याचे या गावांची सांडपाण्याची समस्या सुटणार आहे.

महापालिकेने वगळलेल्या दोन गावांतील कामे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्यासाठीच्या योजनेच्या निधीबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परंतु, सदर योजना आणि निधीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
– विक्रम कुमार, आयुक्‍त, पुणे मनपा

महापालिका २०१७ मध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या ११ गावांसाठी तब्बल ३५२ कोटींची सांडपाणी योजना राबवित आहे. या गावांचे १०० टक्‍के सांडपाणी संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, हे काम सुरू झाल्यानंतर लगेचच शासनाने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेने या दोन गावांच्या सांडपाण्यासाठी मांजरी येथे उभारण्यात येणारा तब्बल १२० कोटींचा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा निधी उर्वरित ९ गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचे जाळे वाढविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्‍तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे ९ गावांचा सांडपाण्याचा प्रश्‍न लवकरच कायमचा मार्गी लागणार आहे. मात्र, या निर्णयाचा फटका फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांना बसणार आहे. स्वतंत्र नगरपरिषदेच्या मागणीनंतर विकासकामे तसेच निधीबाबतचा हा पहिलाच प्रशासकीय फटका असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये