पुणे, नाशिक प्रवास होणार अधिक वेगवान; उपमुख्यमंत्र्यांनी टि्वट करत दिली माहिती

पुणे | आता नाशिकहून (Nashik) थेट पुण्याला आणि पुण्याहून नाशिकला पावणेदोन तासांत पोहचता येणार आहे. यासाठी नाशिक-पुणे (Pune) सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला रविवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी मान्यता दिली. या प्रकल्पात काही त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करुन पुन्हा अश्विनी वैष्णव यांच्यापुढे त्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर या प्रकल्पाला मान्यता मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टि्वट करत ही माहिती दिली आहे.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे मत देखील व्यक्त केले आहे.
पुणे – नाशिक दरम्यान आतापर्यंत फक्त रस्ते प्रवासाचा मार्ग होता. परंतु आता थेट रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे सुमारे सहा तासांचा हा प्रवास पावणे दोन तासांवर येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे प्रकल्प अंमलात आणणार असल्यामुळे वेळ वाचणार असून दोन्ही शहरांचा विकास अधिक वेगाने होणार आहे. हा रेल्वे मार्ग पुणे – अहमदनगर – नाशिक या तीन जिल्ह्यांना जोडणारा आहे.