आंतरराष्ट्रीय प्रदर्शन – पुणे महानगर हे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनावे

पुणे : पुणे महानगरात अनेक अशी क्षेत्रं आहेत जी या महानगरासाठी आर्थिक स्रोत ठरू शकतात. यामध्ये शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, आरोग्यसुविधा, पर्यटन, शेती आणि जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संशोधन, अद्ययावत तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी मेट्रो, रिंग रोड यांसारख्या पूरक पायाभूत सुविधा आपण उपलब्ध करून दिल्यास आगामी काळात पुणे हे नक्कीच गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ’डेस्टिनेशन’ बनेल,’’ असा विश्वास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.
पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीईआरएफ) तर्फे नुकतीच बोट क्लब येथे आयोजित कार्यक्रमात जानेवारी २०२३ महिन्यात होणार्या ’कॉन्स्ट्रो’ या बांधकाम व्यवसाय संबंधित भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या आयोजनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी डॉ. दिवसे बोलत होते. यावेळी शिरीष केंभावी, जयदीप राजे, विश्वास लोकरे, जयंत इनामदार आणि संजय वायचळ आदी उपस्थित होते.
पुण्यात जागतिक स्तरावरील गुंतवणूक आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच पीएमआरडीए ही संस्था विविध प्रकल्प राबवत असून, पुणे हे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनावे, यासाठी कॉन्स्ट्रो प्रदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळेच पुढील काळात या प्रदर्शनाच्या आयोजनात पीएमआरडीए’चा कायमस्वरूपी सहभाग राहील.
— डॉ. सुहास दिवसे, आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)
प्रदर्शनाबाबत माहिती देताना जयंत इनामदार म्हणाले, हे प्रदर्शन १२ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत मोशी येथील इंटरनॅशनल एक्झीबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. हे १७ वे प्रदर्शन असून, ‘इन्फ्रास्टक्चर द कॅटलिस्ट फॉर डेव्हलपमेंट’ ही यावर्षी प्रदर्शनाची संकल्पना असणार आहे. पायाभूत सुविधा ज्यामध्ये इमारती (रहिवासी, औद्योगिक इमारती, व्यावसायिक आस्थापने, संस्था), वाहतूक (मेट्रो, भुयारी मार्ग, रस्ते, फ्लायओव्हर), ऊर्जा (सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि जलऊर्जा ) आणि पर्यावरण पूरक व हरित रचना (लॅन्डस्केप डिझायनिंग, काँटॅ्रक्टर्स या सर्वांचा समावेश असणार आहे. यावर्षी प्रदर्शनात भारताने बांधकाम क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयक चर्चासत्र आणि परिषद घेण्याचे आमचे नियोजन आहे.
गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, चिनाब नदीवर साकारण्यात येत असलेला हवाई पूल, अटल भुयारी मार्ग, मानस रस्ता, सागरकिनारी (मरीनलाइन) बांधकाम, त्याचबरोबर पुण्यातील एका व्यक्तीने अकोला येथे विक्रमी वेळेत केलेले रस्त्याचे बांधकाम अशा विविध विषयांचा यामध्ये समावेश असेल.
‘आभासी प्रदर्शन’ हे यावेळेच्या प्रदर्शनाचे वैशिष्ठ्य असणार आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शकांसाठी आभासी स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.