सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पुण्यातील सौरव महाकाळला अटक
पुणे | Sidhu Moose Wala Murder Case – प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. सिद्धू मुसेवाला यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचं कनेक्शन असल्याचं दोन दिवसांपूर्वी समोर आलं होतं. तसंच पुण्यातील दोन गुंडाचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सौरव महाकाळ याला अटक केली आहे.
सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडात सहभागी असलेल्या आठ शार्पशूटरपैकी तीन पंजाबचे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यासोबत हरयाणा आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन आणि राजस्थानमधील एक आहे. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी हरयाणातून मारेकऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत हरयाणातील तीन जणांना पोलिसांनी पकडले आहे.
तसंच बुधवारी (ता. ८) सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील पुण्यातील आरोपी सौरव महाकाळ याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे महाराष्ट्र कनेक्शन दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. तसंच हत्याकांडातील दोन मारेकरी पुण्यातील असल्याचं बोललं जात होतं. यातील सौरव महाकाळला आज अटक करण्यात आली आहे.