क्रीडाताज्या बातम्या

पीव्ही सिंधूची सुवर्ण भरारी; कॅनडाच्या मिशेल लीविरूद्ध एकतर्फी विजय

बर्मिंगहॅम | Birmingham 2022 Commonwealth Games – कॉमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं कॅनडाच्या मिशेल लीविरुद्ध विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत पीव्ही सिंधूनं मिशेल लीविरुद्ध 21-15, 21-13 असा विजय मिळवला आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचं 19 वं सुवर्णपदक आहे. तर, भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एकूण 56 पदकं जिंकली आहेत. ज्यात 15 रौप्यपदक आणि 22 कांस्यपदकांचा समावेश आहे. 

काॅमनवेल्थ बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पीव्ही सिंधूनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी दाखवली. पहिल्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं 21-15 असा विजय मिळवत सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही पीव्ही सिंधूनं मिशेल लीला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. दुसरा सेटही पीव्ही सिंधूनं 21-13 च्या फरकानं जिंकून सामन्यात एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. 

दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचं पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, 2014 मध्ये ग्लासगो येथे आणि 2018 मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये