लोकसभेत अदानी-मोदींचा ‘तो’ फोटो दाखवत, राहुल गांधींनी केला सवाल.. ये रिश्ता क्या कहलाता है?
नवी दिल्ली : (Rahul Gandhi On Narendra Modi) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेतून संपूर्ण भारत भ्रमंती करून आलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज लोकसभेत जोरदार भाषण केलं. संपूर्ण यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अदानी-अंबानी (Adani-Ambani) उद्योगपतींवर निशाणा साधला. लोकसभेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी दमदार भाषण केलं. अग्निवीर भरती तसेच गौतम अदानी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधांवर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी-अदानी यांचे नेमके संबंध काय आहेत, या प्रश्नाचं उत्तर देशाला जाणून घ्यायचंय, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वीच हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की, अदानींची भारताबाहेर शेल कंपनी आहे. ही शेल कंपनी कुणाची आहे? हजारो कोटी रुपये शेल कंपनी भारतात पाठवतेय, हा पैसा कुणाचा आहे? अदानी हे काम मोफत करत आहेत का? संदर्भात भारतीय कंपन्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही का? हे कोण लोक आहेत? ह्या कोणाच्या कंपनी आहेत… याचं उत्तर मिळायला हवं, अशी भूमिका राहुल गांधी यांनी मांडली.
आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानींसोबत विदेशात जात होते. मात्र आता गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने विदेशात जातात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. अदानी यांच्याकडे एअरपोर्टचा अनुभव नाही. मात्र नियम बदलून त्यांना सहा एअरपोर्टची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्याकडे संरक्षण क्षेत्राचाही अनुभव नसताना ड्रोन बनवण्याची जबाबदारी देण्यात आली.
एचएएलवरही आम्ही चुकीचे आरोप लावले, असे पंतप्रधान म्हणाले, मात्र खरं तर एचएएलचा 126 विमानांचा ठेका अनिल अंबानी यांच्याकडे गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारी सत्तेचा वापर उद्योगधंदे वाढवण्यासाठी कसा करावा, याबद्दल अदानींच्या उदाहरणावरुन हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये धडे दिले पाहिजेत आणि यामध्ये मोदींना गोल्ड मेडल द्यायला हवं, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.