भाजपला अंतर्गत विरोधाने घेरले!

पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने हेमंत रासने यांना उमेदवारी देऊन प्रचंड अंतर्गत कलह ओढवून घेतल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व राहण्यासाठी दिलेली ही उमेदवारी भाजपच्या अनेक नेत्यांना रुचली नसल्यामुळे येथे नागपूर विधान परिषदेसारखे ‘अंतर्गत दुही’चे दर्शन घडेल काय, अशी शक्यता आता जोर धरत आहे. भाजपच्या एका गटाने अंतर्गत विरोध केल्याने नागपूर विधान परिषदेत नुकताच भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पराभव पाहावा लागला आहे
बापट गटाचे महत्त्व
गेल्या काही वर्षांपासून खासदार गिरीश बापट यांचे पक्षातील महत्त्व कमी होत आहे; किंबहुना ते केले जात आहे अशी उघड उघड चर्चा असतेच. रासने यांची उमेदवारी देत असताना ‘बापटशाही’ कमी करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे, अशी चर्चा खुद्द काही पदाधिकारीच करीत आहेत.
गिरीश बापट यांनीदेखील पक्षाच्या या कारभाराच्या विरोधामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती आणि त्याचे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पक्षांमध्ये सध्या चाललेली एकचालकानुवर्तित्वाची भूमिका अनेकांना खटकत आहे. बापट यांचे हे खच्चीकरण त्यांच्या समर्थकांना रुचलेले नाही. तथापि गिरीश बापट आणि त्यांच्या घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग त्या परिसरामध्ये आहे. त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता आहे.
हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट
आज हेमंत रासने यांची उमेदवारी दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री कसबा पेठेमध्ये अनेक ठिकाणी ‘अाधी कुलकर्णी, आता टिळक… हे कुठवर सहन करायचे’ अशा आशयाचे फलक झळकले होते. रासने यांच्या उमेदवारीबद्दल आक्षेप नाही; परंतु भाजपने मेधा कुलकर्णी यांची अशीच वाट लावली; आता टिळक घराणेही राजकारणाच्या बाहेर फेकण्यात आले. बापटांचेही खच्चीकरण सुरू आहे. समाज हा अन्याय कुठवर सहन करणार, अशा आशयाची चर्चा काही घटक करीत आहेत.
‘हिंदुत्ववादी मतांचा एकगठ्ठा’ हे खरे तर कसबा निवडणुकीचे शक्तिस्थळ आहे. परंतु या सगळ्या प्रकारामुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनीदेखील या पोटनिवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेतली आहे.
कोथरूडची सल बाहेर
चंद्रकांत पाटील यांचे काहीही योगदान नसताना कोथरूडकरांवर केवळ पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी लादण्यात आली, परंतु त्या वेळी पक्षाचा बोलबाला होता. मेधा कुलकर्णी यांची भावनिक साद आणि त्यांचे कुठे तरी पुनर्वसन होईल ही आशा, यामुळे दादांना मोठ्या प्रमाणात मतदान झाले. परंतु मेधा कुलकर्णी यांची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोथरूडची सलदेखील या निमित्ताने पुढे आली, अशी चर्चा आहे.
आम्हाला भाजपने ‘बाहुली’ समजू नये अशीही उद्वेगजनक प्रतिक्रिया आता काही गट व्यक्त करीत आहेत.
एकाच घरात सत्तेची पदे
हेमंत रासने यांची प्रभागनिहाय लोकप्रतिनिधित्वाची तिसरी टर्म आहे. ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून गणले जातात. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे. तथापि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून एकाच घरात आणि एकाच व्यक्तीला सातत्याने संधी मिळत राहते याबद्दलची छुपी नाराजी व्यक्त होत आहे. तथापि रासने यांचा संबंध अनेक लोकांशी येत असल्यामुळे आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून त्यांचा व्यापक जनसंपर्क असल्यामुळे त्यांची प्रतिमादेखील येथे विधायक नेतृत्वाची आहे.
सर्वपक्षीय धंगेकर
रवींद्र धंगेकर हे यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. त्यांनी आता पक्ष बदलून काँग्रेसमध्ये पदार्पण केले असले, तरी त्यांचे मनसेमध्ये बऱ्यापैकी संबंध आहेत.
येथे काँग्रेसला मनापासून साथ देण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे, तसेच पूर्वी धंगेकर यांनी, ‘जंगल बदलले, पण वाघ तोच आहे’ असे विधान केले होते. त्यांचे सर्वपक्षीय संबंध, तळागाळातील कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ त्यांना भाजपमधील काही घटकांसहित मनसेसह काही पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते मदत करतील.