‘राज ठाकरेंना पार मोसादची किंवा…’; राज ठाकरेंना सुरक्षा देण्यावरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
मुंबई : सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी उघडपणे भूमिका घेतल्यानंतर त्यांना धमक्या दिल्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा पुरवली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. पीएफआय या संघटनेने राज ठाकरे यांना जर छेडलं तर सोडणार नाही अस जाहीरपणे धमकावलं आहे. यादरम्यान राज ठाकरेंना सुरक्षा देण्यावरुन जितेंद्र आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
१ मे रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असून यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसंच राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज ठाकरे अयोध्येला जाणार की अमृतसरला याच्याशी मला काय करायचं आहे. राज ठाकरेंना पार मोसादची किंवा सीआयएची सुरक्षा मिळू देत…मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही”.
“देशात महागाई असताना अशा मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे. कोणी अयोध्येत गेलं काय, राम मंदिरात गेलं काय.. यामुळे महागाई कमी होणार आहे का? त्याकडे दुर्लक्ष व्हावं आणि महागाईकडे दुर्लक्ष व्हावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत,” असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. लोक श्रीराम म्हणत आहेत, पण महागाई इतकी वाढू देऊ नका की राम नाम सत्य है म्हणावं लागेल असंही ते म्हणाले.
पुढे आव्हाड म्हणाले, “राज ठाकरेंना धमक्या आल्या असतील. आम्ही कुठे नाकारतो आहोत. त्यांना झेड प्लस द्या आमचं काहीच म्हणणं नाही. बाळा नांदगावकर यांनी लिहिलेल्या पत्रावर केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान निर्णय घेतील. लोकशाहीत प्रत्येकाला सुरक्षित ठेवणं शासनाची जबाबदारी आहे.”
“आम्ही १०० वेळा खंडोबा आणि २०० वेळा तुळजापूरला जातो, ते काय जाहीर करुन जातो का? देवळात जाताना काय सांगायचं नसतं. तुमचे आणि देवाचे संबंध असतात. तुम्ही काय समाजाला घेऊन जाता का? मग पिकनिक काढा,” असा टोला देखील जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.