ताज्या बातम्यारणधुमाळी

‘राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये, तिकडे…’- रामदास आठवले

पुणे : आज पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरु असणाऱ्या भोंग्यांसंदर्भातील राजकारणावरुन पक्षाची बाजू पुन्हा अधोरेखित केली आहे. यादरम्यान रामदास आठवलेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

“सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे. मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही. पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये. आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे. राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा आहे. समाज अल्पसंख्याक आहे. धमकीची भाषा कोणी करू नये,” असं आठवले म्हणाले आहेत.

पुढे रामदास आठवले म्हणाले, “राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळा सुनियोजित असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. त्यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती. शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होत, पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.”

“३ मेला जर कोणी मशीदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते मशीदींचं संरक्षण करणार आहेत. आम्ही ही दादागिरी करू शकतो पण आम्हला दादागिरी येते. पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेच आहे. मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे. अजान थोडा वेळाची असते. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची आहे,” असं आठवले म्हणाले.

“भोंग्यांबाबत भाजपाने काय भूमिका घेतली माहिती नाही. पण माझी अन् माझ्या पक्षाची भूमिका मी मांडली आहे. समाजात शांतता राखवी हा आमचा प्रयत्न आहे,” असं आठवलेंनी स्पष्ट केलं आहे. “मनसे आरपीआयची जागा भाजपामध्ये घेणार नाही. राज ठाकरेंना सोबत घेतलं तर मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे राज ठाकरे यांना भाजपाने सोबत घेऊ नये, असं माझं मत आहे. आमचं अस्तित्व संपणार नाही,” असा विश्वास देखील आठवलेंनी व्यक्त केला आहे.

“राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी देऊ नये. तिकडे मुस्लिम समाज जास्त आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकतो. म्हणून सभेला परवानगी दिली तर राज ठाकरे राज्यात वाद निर्माण करत फिरतील. समाजात वाद निर्माण होत असेल तर राज्य सरकारने लक्ष घातले पाहिजे,” असं देखील आठवलेंनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये