राष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

कर्वेरोड मृत्यूचा सापळा

पुणे : शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्याबरोबरच रोजच्या रहदारीवर नागरिक व वाहनांच्या संख्येची अधिक भर सुद्धा पडत आहे. प्रामुख्याने कर्वे रोडचा विचार केल्यास या रोडचा आकार कमी आणि या रोडवर वाहनांची रेलचेल अधिक संख्येने असल्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढणे सुद्धा कठीण होत चालले आहे. या रोडवर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता कर्वेरोड सुद्धा मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून आले आहे. या रोडवरील अपघाताचे प्रमाण लक्षात घेता प्रशासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे.

गेल्या आठवड्यात कर्वे रोडवरील वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) झालेला अपघात दुर्दैवी म्हणावा लागेल. या अपघातात सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक बसल्याने दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या कर्वे रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच या रोडची रुंदी सुद्धा कमी आहे. आता या रोडवर मेट्रोची सुद्धा भर पडली आहे. येथे ओव्हरटेक होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहेत. त्यामुळे वारंवार अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांनी साधारणतः दुचाकीधारकांनी वाहतूक नियमानुसार वाहन चालवावे.
गणेश मोरे पोलीस निरीक्षक ( डेक्कन)

शहरातील बहुतांश रोडपैकी प्रामुख्याने कर्वे रोडचा विचार केल्यास या रोडवर नेहमीच रहदारी असते. गेल्या तीन वर्षात कर्वे रोडवर तब्बल 108 हुन अधिक अपघात झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गंभीर, माध्यम आणि किरकोळ स्वरूपाचे अपघाताचा समावेश आहे. यामध्ये अनेकांचे बळी सुद्धा गेले आहेत. यातील काही अपघाताची नोंद सुद्धा नसल्याचे दिसून आले आहे.

कर्वे रोडवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. गेल्या अडीच वर्षांपासून मी या रोडवरून ये जा करीत आहे. ऑफीस ते कोथरूड येथील घरापार्यंत जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असते. येथील फुटपाथ केवळ नावापुरतेच आहेत. रोडची रुंदी तशी कमी आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. परंतु नागरिकांकडून वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन केले जात नाही. त्यामुळे अपघात होतात. मला सुद्धा पाठीमागून एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली होती. गाडी पडली व मला पायाला, पाठिला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात वाचलो, हे माझं नशीब.
वसंत कदम वाहनचालक (कोथरूड)

गेल्या तीन वर्षाच्या 108 च्या आकडेवारीनुसार विश्लेषण केल्यास दर महिन्याला साधारणतः 3 अपघात झाले असून प्रत्येकी एका वर्षात 36 अपघात झाले आहे. याचे कारणही तितकेच गंभीर असल्याचे पुढे आले आहे. डेक्कन जिमखाना मुख्य चौक ते कर्वे पुतळा चौकपर्यंत या कर्वे रोडवर सातत्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु असते. त्यामुळे साधारणतः दिवसभरातील सकाळ, दुपार आणि सायंकाळी आणि रात्री दहा वाजेपर्यंत सुद्धा कायम वाहतूक कोंडी असते. अशा वाहतूक कोंडीतून वाहन चालकांना मार्ग काढणे कठीण असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या रोडवर वाहने एकमेकांना धडकत असून अनेक अपघात सुद्धा होत आहेत.

साधारणतः कर्वे रोडच्या रुंदीचा आकार शहरातील इतर रोडपेक्षा कमी आहे. कमीत कमी अडीच ते तीन फूट कमी असल्याची माहिती आहे. कमी रुंदी असूनही कर्वे रोडच्या दोन्ही बाजूस काही ठिकाणी पादचारी मार्ग सुद्धा तयार करण्यात आले आहेत. डेक्कन जिमखाना चौक पासून तर कर्वे पुतळापर्यंत दोन ते तीन प्रमुख ठिकाणाजवळ पादचारी मार्ग आहे. या पादचारी मार्गामुळे कर्वे रोडचा काही भाग व्यापला गेला आहे. त्यामुळे या रोडची रुंदी साधारणतः चार फुटाणे कमी झालेली आहे. कमी रुंदी रोडचा थेट परिणाम रोजच्या रहदारीवर होत आहे.

या रोडवरून पुढे जात असताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असते. अशा वेळी एखाद्या जड वाहनांना ओव्हरटेक करीत असतानाच्या नादात सुद्धा अनेक अपघात झाले आहेत. या रोडवर गाडीला धडक देणे, गाड्या पलटी होऊन अपघात होणे असे प्रकार सुद्धा आजही होत असताना पहावयास मिळत आहे. यामध्ये बहुतांश वाहन चालकांचे प्राण सुद्धा गेले आहेत. त्यामुळे अलीकडे कर्वे रोड मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिसून येत आहे.

कर्वे रोडवरील अशाच एका अपघातात दोघांचा बळी …..
गेल्या आठवड्यात सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकवर (मिक्सर) दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात घडली असून मनोज रमेश पाटील (वय २३ रा. बाणेर) आणि नितीन बालाजी मगर (वय १९, रा. बिबवेवाडी) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.

दुचाकीस्वार पाटील व त्याचा मित्र नितीन असे दोघेजण कर्वे रस्त्यावरून जात होते. त्यावेळी वैद्यराज मामा गोखले चौकात (रसशाळा) सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि दुचाकीची धडक दिली. थोडक्यात सांगायचं तर कर्वे रोडवरील अपघातात या दोन युवकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रस शाळेच्या पुढील रोडच्या भागाची रुंदी पीडब्ल्यूडीच्या नियमानुसार कमी आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे येथे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी समोरील वाहनांना ओव्हरटेक केले जाते. अशा ओव्हरटेकच्या नादातच ते दोन युवक बळी पडले आहेत, अशी माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये