लीलावती रुग्णालयातील नवनीत राणांच्या ‘फोटो सेशन’ वर राजेश टोपेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
पिंपरी चिंचवड : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात केलेल्या फोटो सेशनवर प्रतिक्रिया दिली आहे. रुग्णालयातील एमआरआय (MRI) विभागात फोटो काढणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला असता राजेश टोपे यांनी आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही, असं मत व्यक्त केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी राजेश टोपे म्हणाले, “मी आरोग्यमंत्री आहे, मात्र आतापर्यंत अशाप्रकारे सीटी स्कॅन किंवा एमआरआय काढताना फोटो सेशन करणं कोठेही पाहिलेलं नाही. लीलावती रुग्णलयात ज्या पद्धतीने फोटो काढण्यात आलेत ते रुग्णालयाच्या दृष्टीने फार चुकीचं आहे. तसेच रुग्णालयाला अंधारात ठेऊन दुसरं कोणी फोटो सेशन केलं असेल तर तेही चुकीचं आहे.”
“टीआरपी वाढवण्यासाठी अशा गोष्टी करू नयेत. काही कायदेशीर बाबी/नियम असतात त्याचं पालन झालं पाहिजे. कोणी आजारी असेल तर ते सार्वजनिकपणे इतरांना सांगण्याची गरज नाही. त्या व्यक्तीची तपासणी व्हायला हवी, आजारी असल्यास त्याच्यावर उपचार केले पाहिजेत. मात्र, त्यात राजकारण करण्याचं काम करू नये. ही चुकीची पद्धत आहे.” असंही राजेश टोपे म्हणाले.