अक्षय तृतीया-रमजान ईद एकत्र येण्याचा योग

पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांचे मत
इंदापूर : हिंदू-मुस्लिम समाजामध्ये उपवास या धार्मिक कार्याला मोठे महत्त्व आहे. उपवासामुळे शारीरिक व मानसिक क्षमतेमध्ये सकारात्मक बदल होत असतात. यावर्षी अक्षय तृतीया आणि रमजान ईद हे सण एकाच दिवशी साजरे होत असून, अनेक वर्षांनंतर असा योग जुळून आलेला आहे, असे विचार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.
कादरिया वेल्फेअर सोसायटी आणि जुन्नर पोलिस ठाण्याच्या वतीने अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणामध्ये रोजा इफ्तार कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक विकास जाधव, नगराध्यक्ष श्याम पांडे, भाजपच्या नेत्या आशा बुचके, विनायक तांबे, उज्ज्वला शेवाळे, सुनील मेहेर, अलका फुलपगार, फिरोज पठाण, भूषण ताथेड, सचिन गिरी, रउफ खान, वाजीद इनामदार, जफर कुरेशी आदी उपस्थित होते.
अभिनव देशमुख म्हणाले, रोजा इफ्तार कार्यक्रमामुळे हिंदू मुस्लिम समाजबांधव एकत्र येतात. या दोन्ही बांधवांमधील सामाजिक एकोपा, सामाजिक शांतता कायम राहण्यास अशा कार्यक्रमांमुळे मदतच होते. जुन्नरमधील हिंदू मुस्लिम समाजातील सामाजिक एकोपा कायम राहावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.