राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

लक्ष्मण हसण्यामागील खरे कारण…

सर्व जणांच्या शंका दूर झाल्या आणि सर्व जण लक्ष्मणाच्या हसण्यात सामील झाले. राज्याभिषेकाचा सर्व सोहळा आनंदात पार पडला. तात्पर्य काय, प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून होणार्‍या घटनेचे अर्थ लावतो आणि त्यामुळे बहुतेक वेळा विनाकारण गैरसमज होऊन आनंदाला मुकतो.

१४ वर्षांच्या वनवासानंतर, विजयी होऊन श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर त्यांच्या मंगलमयी राज्याभिषेकाचा सोहळा चालू असताना वातावरण एकदम चिंताक्रांत, गंभीर झाले… घडलं असं…
राज्याभिषेकाचा सोहळा सुरू होता. सर्व जण आनंदाने भाग घेत होते. सर्वांचे लक्ष, कौतुक, आदर केलेल्या कर्तव्यपालनामुळे लक्ष्मणाकडे होते.

श्रीरामाच्या मस्तकावर राजमुकुट चढविला जात होता, सुवर्णफुले उधळली जात होती. त्याच वेळेला लक्ष्मणाला अचानक हसताना सर्व जणांनी पाहिले.

राजपुरोहितांना वाटले, लक्ष्मण आपल्यालाच हसतोय, कारण १४ वर्षांपूर्वी त्यांनीच काढलेल्या मुहूर्तावर राज्याभिषेक होण्याऐवजी श्रीरामाला वनवासात जावे लागले होते. कैकयीला वाटलं, “कसा नाकावर टिच्चून राम राजा झाला की नाही,” असं आपल्याला खिजवून तो हसत आहे. ऊर्मिलेला वाटलं, आपला नवरा आपल्यालाच हसतोय. कारण तिला मनातून वाटतं होतं “राम आणि भरत दोघेही राजा व्हायला नाही म्हणत आहेत, तर लक्ष्मणाचा नंबर लागेल” आणि हे तिने त्याला कालच सांगितलं होतं.

लक्ष्मणाच्या हसण्याने अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे रामाच्या लक्षात येते. म्हणून तो लक्ष्मणाला म्हणतो, “अरे लक्ष्मणा, तू जो अचानक हसतो आहेस त्यामुळे सर्व सोहळ्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन, सर्व जण बुचकळ्यात पडले आहेत. तरी तू का हसतो आहेस, हे सर्वांना सांग.” लक्ष्मण हसत म्हणाला, “आपण वनवासात जाण्यापूर्वी मी निद्रादेवतेला प्रसन्न करवून घेतले होते. तिने दिलेल्या वरामुळे गेली १४ वर्षे सलग जागा राहून, मी आपले रक्षण करण्याचे कर्तव्य पार पाडले.

काही वेळापूर्वी तीच निद्रादेवता माझ्यासमोर प्रगट झाली आणि तिने मला दिलेला वर परत घेतल्याचे सांगितले, म्हणून मी समाधानाने हसलो, कारण आता १४ वर्षांनंतर मी आजपासून शांत झोपू शकेन.” आणि तो परत हसला. सर्व जणांच्या शंका दूर झाल्या आणि सर्व जण लक्ष्मणाच्या हसण्यात सामील झाले. राज्याभिषेकाचा सर्व सोहळा आनंदात पार पडला. तात्पर्य काय, प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून होणार्‍या घटनेचे अर्थ लावतो आणि त्यामुळे बहुतेक वेळा विनाकारण गैरसमज होऊन आनंदाला मुकतो, म्हणून मनातल्या मनात विचार करून गैरसमज करून घेण्याऐवजी बोलून मोकळे व्हा आणि
आनंदी राहा…!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये