“शिवाजी पार्कचा दसरा मेळावा एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे”- रामदास आठवले
मुंबई | Ramdas Athawale On Dasara Melava – यंदाचा दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच मुंबई महापालिकेकडून मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळालेली नाही. तसंच आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दसरा मेळाव्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, “खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय. त्यामुळे दसरा मेळाव्याला खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे.”
“उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र शिवाजी पार्कचा दसरा मेळावा जो आहे तो एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं त्यांना परवानगी द्यावी, अशी आमची महापालिकेला सूचना आहे”, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री आज कल्याणमध्ये कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत हे वक्तव्य केलं आहे.