…अन् ‘ही’ जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात घ्यावी, रामदास कदमांची मागणी

मुंबई : (Ramdas Kadam On Uddhav Thackeray) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ओल्या दुष्काळाची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांशी सवाद साधत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर शेताच्या बांधावरच पत्रकार परिषद घेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांच्या याच दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्त्र डागलं आहे.
यावेळी रामदास कदम म्हणाले, “कोकणात वादळाचं मोठं संकट आलं होतं. यावेळी लाखों कुटुंबं उद्ध्वस्त झाली होती. या कुटुंबांचं अश्रू पुसण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोकणात गेले नाहीत. इतकं वय असताना देखील शरद पवारांसारखे नेते मात्र नुकसानग्रस्तांची पाहणी करायला गेले होते”.
पुढे ते म्हणाले, “माझं अंत:करणातून एक मागणं आहे. अजित पवारांनी आता विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा आणि ही जबाबदारी उद्धव ठाकरेंनी आपल्या हाती घ्यावी, असं मला आता वाटतं” असंही कदम म्हणाले.