‘अब्दुल सत्तारांना बडतर्फ केल्याशिवाय गप्प बसणार नाही’; राष्ट्रवादीकडून राज्यपालांकडे सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई NCP AGAINST ABDUL SATTAR : महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल (०७ नोव्हें) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाबाबाद वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांविरोधात सर्वत्र आंदोलने, घोषणाबाजी केली आहे. सत्तारांनी वक्तव्य केल्यापासून राज्यभरातून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देखील सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या एका शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीने राज्यपालांकडे केली आहे. मंत्रिमंडळात असणाऱ्या जबाबदार मंत्र्याने अशी भाषा वापरणे, संसदेत काम करणाऱ्या महिलेबद्दल असे अपशब्द वापरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. सत्तारांना बडतर्फ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला आहे. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रस्टो, राखी जाधव, नरेंद्र राणे, अदिती नलावडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, अब्दुल सत्तारांनी केलेल्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाहीत. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांबाबाद मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तार यांचा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोध केला जात आहे.