“हनुमान चालिसेला विरोध केल्यामुळेच…”, रवी राणांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई | Ravi Rana On Uddhav Thackeray – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचे निर्देश दिले. त्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
यावेळी रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसेचा विरोध केला. हनुमान चालिसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये टाकण्यात आलं. राजद्रोहासारखा गुन्हा दाखल केला. हनुमान चालिसेचा विरोध केला त्यामुळेच आज उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण हे चिन्ह श्री राम भगवंतांनी हिसकावून घेतलं आहे. उद्धव ठाकरेंना शिक्षा मिळाली आहे. त्यांनी 14 दिवस एका महिलेला जेलमध्ये टाकलं, म्हणून श्री राम भगवंतांनी आणि हनुमानांनी त्यांना शाप दिलेला आहे. त्यामुळे त्यांचं धनुष्यबाण चिन्ह गोठलेलं आहे, अशी खोचक टीका रवी राणांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, ठाकरे गटानं पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर शिंदे गटानंदेखील उगवता सूर्य, त्रिशुळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय दिला आहे.