“सगळी पदं उपभोगल्यानंतर…”, नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया
मुंबई | Neelam Gorhe – नुकताच ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. आज (7 जुलै) दुपारी त्या ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात सामील झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच आता नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला. अनिल परब म्हणाले की, “नीलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांच्या मेहनतीवर चार वेळा आमदारकी उपभोगली आहे. त्याबद्दल माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. पण त्यांनी ज्या शिवसैनिकांच्या जोरावर ही सगळी पदं उपभोगली आहेत त्या शिवसैनिकांना नीलम गोऱ्हे शिंदे गटात गेल्याचं पाहून किती यातना होतील याचा विचार त्यांनी करावा.”
“आपल्याला काही मिळालं नाही म्हणून पक्ष सोडून जणारे भरपूर लोक आहेत. असं असलं तरी लाखो कार्यकर्ते असे आहेत जे पक्षाच्या वाईट दिवसात उद्धव ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे जरी असे संधीसाधू लोक पक्षातून गेले तरी त्यांची जागा आम्ही नक्कीच भरून काढू. पण दु:खाची गोष्ट सांगायची झाली तर, सगळी पदं उपभोगल्यानंतर पक्षाला दगा देणं आणि वार करणं हे एका उच्च पदस्थ पदाधिकाऱ्यांना शोभत नाही”, अशी टीकाही अनिल परब यांनी नीलम गोऱ्हेंवर केली.