बंडखोर खासदार धैर्यशील मानेंवर सोशल मीडियावर कमेंटमधून सडकून टिका!
कोल्हापूर : (Rebel MP Dhairyasheel Mane trolled on social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदार आणि 12 खासदारांसह बंडखोरी करुन शिवेसेनेला मोठं खिंडार पाडलं. शिंदेंच्या या बंडात कोल्हापूर जिल्ह्यातही दोन सेना खासदार सामील झाले आहेत. मात्र, नेत्यांकडून झालेली ही बंडखोरी सर्वसामान्य जनतेसह शिवसैनिकांना रुचलेली नाही. त्यामुळेच बंडखोरांना सोशल मीडियासह सभेमध्येही त्याचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर विमानतळासंदर्भात एक बैठक पार पडली. झालेल्या बैठकीला शिंदे गटातील बंडखोर धैर्यशील माने यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर त्यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत त्याची माहिती दिली. मात्र, त्या पोस्टवरून कौतुक किंवा समर्थन होण्याऐवजी त्यांना शिवसैनिकांसह सामान्य नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोलींग झाल्याचं पहायला मिळलं.
सोशल मीडियावर गद्दार, आता माजी खासदार, परत येणार नाही, अतिशय लहान वयात राजकीय आत्महत्या केली, कार्यकर्ते हा शब्द विसरून जावा #माजी खासदार साहेब, सर्व कमेंट्स वाचा आणि आताच राजकीय संन्यास घेण्याची मानसिकता करून ठेवा, अशा असंख्य शब्दांमध्ये त्यांना ट्रोल करत चांगलाच समाचार घेतल्याने अखेर धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा कमेंट सेक्शन बंद केला आहे. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा राज्यभर चर्चा होताना दिसत आहे.
.