बेगम अख़्तरला आठवताना…

श्रीनिवास वारुंजीकर
आपल्या आयुष्यामध्ये अभिजात साहित्य, संगीत वा कलाकृती म्हणजे काय असतं, तेच अनेकदा अनेक जणांना माहिती नसतं. मुळात अभिजात कला म्हणजे काय, याचा तर आजच्या पिढीला अर्थच उमगत नाही.
मल्लिका-ए-गज़ल’ अथवा ‘स्वरांची बेगमसाहिबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जुन्या जमान्यातील विख्यात गायिका बेगम अख्तर! दादरा, ठुमरी आणि गज़लगायनासह शास्त्रीय आणि उत्तर हिंदुस्तानी कंठसंगीतातील सर्वांत आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या अख्तरीबाईंचं गाणं ऐकणं, म्हणजे एक भाग्ययोग समजला जातो. सन १९६८ मध्ये पद्मश्री, सन १९७२ मध्ये संगीत-नाटक अकादमी पुरस्कार आणि सन १९७५ मध्ये मरणोत्तर पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित बेगम अख्तर यांची गायकी मनाला हुरहुर लावणारी होती.
‘वो जो हम में तुम में करार था, तुमे याद हो के न याद हो…’ ही गझल कुठंही कानावर पडली, की कृपया ही गझल पूर्ण ऐका आणि गझल सादर करणाऱ्या बेगम अख्तरच्या गायकीची नजाकत अनुभवा. शास्त्रीय संगीतात स्वर आणि ताल प्रधान असतात, तर सुगम संगीतात त्याबरोबरच शब्दप्रधान आणि अर्थसमृद्ध अशी गायकी असते.
अशी गझल गायकी आणि ठुमरी गायन लोकप्रिय करण्यात ज्यांचा मोठा वाटा आहे, त्या बेगम अख्तर यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९१४ रोजी उत्तर प्रदेशातील फैज़ाबाद जिल्ह्यातील भदरसा गावाजवळील बडा दरवाजा येथे झाला. त्यामुळे त्यांना अख्तरीबाई फैज़ाबादी या नावानेही ओळखले जाते.
महान सारंगीवादक उस्ताद इमदाद खान यांच्याकडे प्रथम आणि नंतर पतियाळाचे महान गायक अता मोहम्मद खान यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यानंतर कोलकाता येथे जाऊन बेगम अख्तर यांनी मोहम्मद खान, अब्दुल वाहीद खान आणि लाहोरचे सुप्रसिद्ध गायक उस्ताद झंडेखान यांची तालीम घेतली.
सुप्रसिद्ध गायिका फैयाज यांना बेगम अख्तर यांच्याकडून गझल गायकीचा अंदाज शिकण्याची संधी लाभली होती. मुंबईत एकदा ओळख झाल्यानंतर फैयाझ आणि बेगम अख्तर यांचं गुरू-शिष्याचं नातं जुळलं ते कायमचं. फैयाजनी एकदा अख्तरीबाईंना ‘कट्यार काळजात घुसली’चा प्रयोग बघायला येण्याचं निमंत्रण दिलं. त्यांनीही ते मनापासून स्वीकारलं आणि एक दिवस आल्या ‘कट्यार…’ पाहायला. तिथं प्रयोगाआधीच त्यांची आणि पं. वसंतराव देशपांडेंची भेट झाली. ते एकमेकांना आधीपासूनच चांगले ओळखत होते. वसंतरावांनी आवाज देऊन मला जवळ बोलावलं. माझ्याकडे बोट दाखवत बेगमजींना म्हणाले, ‘ये तुम्हे और तुम्हारे गायकी को बहोत चाहती है. इसे कुछ सिखाओ.’ यावर बेगमजींनी आनंदाने मान डोलावली आणि त्या ‘कट्यार…’चा प्रयोग बघायला बसल्या. फैयाज यांच्या ‘लागी करेजवाँ कट््यार’ गाण्याने तर बेगमजींच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
उर्दू शब्द नजाकतीने कसे उच्चारायचे, त्यांची फेक कशी करायची, आवाजाचा लगाव आणि श्वासावरील नियंत्रण या सर्व गोष्टींचा परिपाक असलेलं गाणं म्हणजे बेगम अख्तर यांचं गाणं…