नारायणराव सणस विद्यालयात विठुरायाचे नामस्मरण

पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयात हरिनामाच्या गजरात व टाळ-मृदंगाच्या तालावर रिमझिम पावसाच्या सरीत बालवारकरी आनंद घेत विठुरायाच्या नामस्मरणात दंग होत भक्तिरसात चिंब झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून विठ्ठल-रखुमाईची व्यक्तिरेखा साकारली. मुली तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पालखी सोहळ्यात तल्लीन झाल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बांदल, पर्यवेक्षिका सुवर्णा परदेशी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी अभंग आणि ओव्या सादर केल्या. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचा सांस्कृतिक ठेवा, भक्तीची जोपासना व्हावी या उद्देशाने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पालखी सोहळ्याचे नियोजन विद्यालयातील उपशिक्षिका दीपाली ठोंबरे, कविता गायकवाड, ज्योती खोत, मनीषा कुंभार, अर्चना शेळके, पूनम भंडारे, अनिता पाटसकर आणि सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.