पुण्यात मनसेला खिंडार! 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’
पुणे | एकीकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. पुण्यात एकाचवेळी 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र तरी देखील मनसेचे काही कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करत असल्याची माहिती पक्षश्रेष्ठींना मिळाली. यावर कठोर पाऊलं उचलत पक्षश्रेष्ठीनी 7 कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली.
दरम्यान, या हकालपट्टीनंतर काही पदाधिकारी नाराज झाले. आणि याच नाराजीतून त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आता पुण्यातील याच 50 पदाधिकाऱ्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत कसब्यात रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करण्याची उघड भूमिका घेतली आहे. आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे.