रिक्षाची भाडेवाढ करण्याची मागणी; रिक्षाचालक संघटनेच्या बैठकीत निर्णय
पिंपरी : मागील काही दिवसांपासून महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. खाद्यपदार्थांपासून ते दैनंदिन लागणार्या वस्तूपर्यंत गेल्या आठ वर्षांत महागाईने उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांची महागाई ८.३८ टक्के झाली आहे. त्यातच रेपोदरात ०.४० टक्के वाढ झाली. मागील वर्षी मे महिन्यात पेट्रोलदर ७८ रुपये होता, आता १२२ वर गेला आहे, तर सीएनजी गॅस ६२ रुपये होता, आता ७७.२० रुपये झाला आहे.
सर्व वस्तू व सेवांचे दर वाढत आहेत, मात्र आमच्या रिक्षाचालकांची भाडेवाढ कधी होणार, असा सवाल कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र व सारथी चालक-मालक महासंघाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला.
पिंपरी येथे झालेल्या बैठकीसाठी कामगारनेते काशिनाथ नखाते, निमंत्रक राम बिरादार, सामाजिक कार्यकर्ते नाना कसबे, महादेव सोनवणे, अनंत कदम, आतिश वडमारे, बबन हिवाळे, मार्तंड कांबळे, राजकारण पटेल, ओमप्रकाश मोरया, विशाल रिटे आणि रिक्षाचालक उपस्थित होते. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
नखाते म्हणाले, महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे अशा लाखो कुटुंबांना महागाईचा तडाखा बसला असून केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे मध्यमवर्गीय व सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.
त्यातच रिक्षाचालकांना परतीचे भाडे मिळत नाही. बस, ट्रॅव्हल, टुरिस्ट असो वा रेल्वे यांचे प्रवासीदर वाढवण्यात आले. मात्र रिक्षाचालकांचे अजूनही दर वाढवण्यात आले नाहीत. यासाठी आरटीओ व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.