रितेश देशमुखचा ट्विटर पोल, जनता देणार कौल; इंडिया, हिंदुस्थान की भारत 24 तासांत ठरणार..

मुंबई : (Ritaish Deshmukh Tweeter Poll) सध्या देशभरात नाव बदलाची चर्चा सुरु आहे. मोदी सरकार देशाचं नाव बदलून भारत करण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव मोदी सरकारकडून मांडण्यात येण्याची शक्यता आहे. देशाचं नाव इंडियाऐवजी भारत करण्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर सर्वच स्तरातून देशात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कलाविश्वातील सेलिब्रिटीही यावर व्यक्त होत त्यांचं मत मांडताना दिसत आहेत.
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही आता याबाबत एक ट्वीट केलं आहे. रितेशने त्याच्या ट्विटरवरुन देशाचं नाव बदलण्याबाबत एक पोल घेतला आहे. या पोलमध्ये त्याने भारत, इंडिया, हिंदुस्थान आणि सगळे सारखे आहेत असे चार पर्याय दिले आहेत. ट्विटरवरुन हो पोल शेअर करत रितेशने तुम्हाला काय वाटत? असा प्रश्न विचारला आहे. २४ तासांसाठी रितेशच्या यो पोलला चाहत्यांना वोट करता येणार आहे. या पोलला आत्तापर्यंत १९,८६६ लोकांनी वोट केलं आहे. आता चाहत्यांचा कौल कुणाला असणार हे पाहावं लागणार आहे.
संपूर्ण देशभरातच नाव बदलण्याच्या चर्चा आहेत. सध्या सुरु असलेल्या जी२० परिषदेच्या स्नेहभोजन पत्रिकेवरही प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देत असताना त्यांच्या समोरही भारत लिहिलेलीच पाटी होती. मोदी सरकार १८-२२ सप्टेंबर रोजी संसदेच्या या विशेष अधिवेशनात इंडिया हे नाव बदलून भारत करण्यात येण्याचा प्रस्ताव माडंण्यात येण्याची शक्यता आहे.