‘…धुळे जिल्ह्यातील रस्ते अमेरिकेच्या दर्जाचे असतील’-नितीन गडकरी
धुळे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज धुळे शहर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्घाटन, राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी येत्या तीन वर्षात धुळे जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पुढे नितीन गडकरी म्हणाले, येणाऱ्या काळात मी टोल नाके बंद करून जीपीएस यंत्रणा उभी करणार आहे. त्यामुळे टोल न भरण्याचं टेन्शनच संपून जाईल. हेच नंदुरबार व धुळे जिल्ह्यात करायचे आहे. याच दृष्टीने येत्या तीन-चार वर्षात दोन्ही जिल्ह्यातील रस्ते हे अमेरिकेच्या दर्जाचे असतील असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.
धुळ्यात येताना माझं मन शांत होतं. कारण खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जी काम सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेचं काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.
धुळे शहरात ज्या कॉन्ट्रॅक्टरला ठेका दिला जातो तो दिवाळखोरीत जातो. त्यामुळे मला टेन्शन येत होतं की ऑर्डर देऊनही कामं होत नाही. त्यामुळे मला आनंद आहे की ते सर्व काम पुन्हा सुरू झालं, असंही ते म्हणाले.
तसंच यावेळी म्हटलं की, राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही. जे नेते खोटं स्वप्न दाखवतात त्यांच्याबद्दल तात्पुरतं प्रेम असतं आणि जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते असे म्हणत नितीन गडकरी यांनी काही नेत्यांना टोला देखील लगावला.