भाजप ‘गोधन खतरे मे’ म्हणत होते, लम्पी स्कीनवरुन रोहित पवारांचा भाजपला टोला!

मुंबई : (Rohit pawar On BJP Leaders in Maharashtra) मागच्या काही वर्षापासून राजकीय समीकरण जुळवण्यासाठी ‘गोधन खतरे मे’ आहे असं सांगणारे आता खऱ्या अर्थाने गोधन संकटात असताना एक चकार शब्द काढायला देखील तयार नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
सध्या दिवसेंदिवस लम्पी आजारामुळे जनावरांच्या मृत्यूची आकडे वाढताना दिसत आहेत. हा धोका आता राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांसाठी मोठ्या प्रमाणानर चिंतेचा विषय आहे. मृत्यू झाल्यावर राज्य सरकारने देवू केलेली 30 हजारांची तुटपुंजी मदत ही जनावरांच्या वाढत्या किंमतीमुळे पुरेशी नाही. त्यामुळे पशुपालांना अतिरिक्त मदत मिळणं गरजेचं असल्याचे मत राहित पवारांनी व्यक्त केलं आहे.
आत्तापर्यंत देशात 82 हजार जनावरं लम्पी आजाराला बळी पडून दगावली आहेत. तर लाखो जनावरं लंम्पी आजाराचा सध्या सामना करत आहेत. त्यामुळे पशुधनावर आणि पर्यायाने बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. मात्र, राजकारणासाठी ज्यांचा तिसरा डोळा क्षणार्धात उघडतो तो अद्यापही उघडलेला नाही. चित्ते रुळले असतील तर लम्पीकडं लक्ष केंद्रित करायला हरकत नाही, असा टोला रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.