आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी-सचिनला जमलं नाही, ते हिटमॅन रोहित शर्मानं करून दाखवलं!
नवी दिल्ली : (Rohit Sharma ODI Record IND vs NZ 3rd ODI) मागील अनेक सामन्यांमध्ये निराशजनक कामगिरी करणारा भारताचा कर्णधार रोहित शर्मा आज चांगलाच फार्ममध्ये दिसून आला. अखेर 16 महिन्यांनी रोहित शर्माच्या बॅटमधून तुफान आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी शतकी खेळी आली. त्याने 85 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारांसह 101 धावांची ताबडतोड खेळी करून प्रेक्षकांना आपला करिष्मा दाखवला. या शतकी खेळबरोबरच रोहित शर्माने भारताचे महान फलंदाज सचिन, विराट आणि धोनीला यांचे रेकाॅर्ड मोडत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
रोहित शर्मा पहिल्या पॉवर प्लेमध्ये हातचं राखून खेळत होता. मात्र दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्याने आक्रमक अवतार धारण केला. त्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत आक्षरशः धावांचा पाऊसच पाडला. हिटमॅन रोहित शर्माने आपल्या इनिंगमधील तिसरा षटकार मारला आणि तो भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा पहिला तर जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याने जगात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. रोहित शर्माचे आता वनडेमध्ये 273 षटकार झाले आहेत. त्याच्यापुढे आजून ख्रिस गेल (331) आणि शाहिद आफ्रिदी (351) हे दोन फलंदाज आहेत.
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा (273) पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर 229 षटकार मारणारा महेंद्रसिंह धोनी आहे. 195 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर येतो. तर सौरभ गांगुलीने 190 षटकार मारत चौथे स्थान पटकावले आहे.