शिंदे गटाचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ”राऊतांनी सांगितलं,जोशींच्या घरी पेट्रोल घेऊन जा अन्…”

मुंबई : (Sada Sarwankar On Sanjay Raut) विधानसभेच्या उमेदवारीवरुन झालेल्या नाराजीनंतर संजय राऊतांनी मला मनोहर जोशी यांचं घर जाळायला सांगितलं, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. एका जाहीर कार्यक्रमात पडद्यामागे घडलेल्या घटनेचा घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे. ही घटना सांगून सरवणकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
सदा सरवणकर म्हणाले की, आमदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी मला मनोहर जोशींनी ‘मातोश्री’वर ताकद दाखवायला सांगितलं. पण नंतर माझी उमेदवारी कापली. जोशी सरांच्या घरावर हल्ला करण्याचा उद्धव ठाकरेंचा निरोप मिलिंद नार्वेकरांनी दिला होता, असं ते म्हणाले.
ज्यावेळी मला उमेदवारी नाकारली तेव्हा मी मनोहर जोशींना काय करु, असं विचारलं. ते म्हणाले, सदा तुला तुझी ताकद दाखवावी लागले.. ‘मातोश्री’वर शिवसैनिकांना घेऊन जा. मग मी ‘मातोश्री’वर गेलो. उद्धव ठाकरे बसलेले होते. ते म्हणाले, मला वाटतंय तूच निवडून येऊ शकतो. तूच आमचा उमेदवार. पण करणार काय? तुला उमेदवारी नाही देऊ शकत अन् कारणही नाही सांगू शकत.
सरवणकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे तिथून निघून गेले. मिलिंद नार्वेकर तिथं होते. त्यांना एक फोन आला. फोनवर बोलणं झाल्यानंतर नार्वेकर म्हणाले, तुमचं तिकिट मनोहर जोशींनी कापलेलं आहे. त्यामुळे हे शिवसैनिक जोशींच्या घरी घेऊन जा. मग मी जोशी सरांच्या घराकडे निघालो. थोडं पुढे गेलो असेल तर संजय राऊतांचा फोन आला. मला म्हणाले कुठे चालले? त्यांना कशाला सांगायचं त्यामुळे मी उडवाउडवीची उत्तरं दिली. सेना भवनाला चाललो वगैरे… ते म्हणाले, तू मनोहर जोशींच्या घरी चालला आहेस ना, मोर्चा घेऊन. मग तू असाच जाऊ नकोस. पेट्रोल घेऊन जा, जाळून टाक त्यांचं घर.. काही शिल्लक ठेवू नकोस.