“महाराजांवरील हा चित्रपट दाखवणं थांबवा, नाहीतर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे”
मुंबई – SAMBHAJI BRIGADE : नुकतंच संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरून संताप व्यक्त केला आहे. चित्रपटात महाराजांच्या खऱ्या इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापुढे असे चित्रपट काढले तर गाठ संभाजीराजे छत्रपतींशी आहे असा इशारा त्यांनी दिला होता. त्याचबरोबर आता संभाजी ब्रिगेडने देखील याच मुद्द्यावरून चित्रपट गृहात सुरु असेलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित करणे थांबवा म्हणून इशारा दिला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. त्यांच्या इतिहासाची मोडतोड करून हर हर महादेव चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट गृहात हा चित्रपट दाखवणे थांबवा’ अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
‘चित्रपटगृहात हर हर महादेव चित्रपट दाखवणे थांबवा नाहीतर, चित्रपट गृहातील पडदे फडल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट देखील शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार केला जात आहे. यामध्ये आक्राळ विक्राळ मावळे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा नाहीतर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.