सणसवाडी एमआयडीसी दुर्घटना; कंपनी भीषण आग

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरूर येथील श्रीनाथ प्लास्टिक या कंपनीला रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाच्या तीन पथकांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. कंपनीचे तब्बल दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथील एल अँड टी फाटा परिसरातील श्रीनाथ प्लास्टिक कंपनीमधील कामगार कंपनीत काम करत असताना वेल्डिंगचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अचानकपणे आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. काही वेळात आगीने मोठा पेट घेतला. या आगीचा धूर दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होता. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतक, रणजित पठा, पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलीस शिपाई अमोल रासकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दकर, पोलीस मित्र पप्पू सासवडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात प्रयत्न सुरु केला.
दरम्यान, कंपनीमधील सिलेंडर तसेच शेजारी असलेल्या विद्युत रोहीत्राचे स्फोट झाले. काही वेळात रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप पावणे, भाऊसाहेब बागुल, बाळू पवार, सचिन मिसाळ, शुभम यादव तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे विजय महाजन, संदीप शेळके, नितीन माने, मयूर गोसावी, चेतन खमसे, उमेश फाळके, विकास पालवे, अभिजित दराडे, संदीप तांबे, ओम पाटील, प्रशांत अडसूळ यांचे दोन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रयत्न सुरु केले, दरम्यान पोलीस मित्र पप्पू सासवडे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सदर ठिकाणची आग आटोक्यात आली. मात्र, आगीमध्ये कंपनीतील सर्व मशिनरी तसेच साहित्य जळून खाक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी
शिक्रापूरसह परिसरात सणसवाडी, कोेरेगाव भीमा, तळेगाव ढमढेळे, पिंपळे जगताप यांसह आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत असून अनेकदा येथे आगीच्या घटना घडत आहेत. परंतु घटना घडल्यानंतर अग्निशामक यंत्रणा रांजणगाव अथवा वाघोली येथून येई पर्यंत वाट पहावी लागते. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण वाढते. शासनाने औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी अग्निशामक यंत्रणा उभारावी अशी मागणी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दाकर यांनी केली आहे.