“जे अडीच वर्षात पेरलंय ते आता…”, मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक टोला
मुंबई | Sandeep Deshpande On Shivsena – राज्यातील सर्व गणेशभक्तांनी दहाव्या दिवशी लाडक्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. मात्र यावेळी प्रभादेवीमध्ये एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनाचा गट यांच्यामध्ये जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर गेलं असून सदा सरवणकरांनी शनिवारी गोळीबार केल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभादेवीमध्ये दहाव्या दिवशी मिरवणुकीदरम्यान शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूंनी बाचाबाची झाली. त्यात सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी ‘म्याँव म्याँव’ म्हणत शिवसेनेवर टीका करणारं भाषण केल्यानंतर वातावरण अधिकच तापलं होतं. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रात्री पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून या वादात आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. मात्र, हा कौटुंबिक वाद होता, असं म्हणत सदा सरवणकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच, गोळीबाराचे आरोप देखील फेटाळून लावले आहेत.
या संदर्भात आत मनसेनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 शी बोलताना यावर भाष्य केलं आहे. “दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी”, असं ते म्हणाले.
पुढे संदीप देशपांडे म्हणाले, “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचं स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या. त्यामुळे जे पेरलंय, ते उगवतंय”.